
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
परभणी, 08 एप्रिल (हिं.स.)।
मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयाच्या मैदानावर रविवारी (दि. 12) भव्य निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेत तब्बल 16 लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून ‘राज्यमंत्री केसरी’ किताबासाठी कुस्ती शौकिनांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या ऐतिहासिक कुस्ती मैदानात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक मल्लांना संधी देण्यात आली आहे. स्पर्धेची सुरुवात 2 हजार रुपयांच्या बक्षिसापासून होणार असून मुख्य लढती लाखो रुपयांच्या घरात आहेत. विशेष आकर्षण असलेल्या पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी 3 लाख 45 हजार रुपये व मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सिकंदर शेख (गंगावेस तालीम) विरुद्ध अजय बनवाल (दिल्ली) यांच्यात 3 लाख 45 हजार रुपये व चांदीची गदा, भारत मदने विरुद्ध गणेश जगताप यांच्यात 2 लाख 45 हजार रुपये व चांदीची गदा, प्रमोद शिंदे विरुद्ध रोहन जगताप यांच्यात 1 लाख 45 हजार रुपये व चांदीची गदा, भैरवनाथ जोगी विरुद्ध नकुल पहेलवान यांच्यात 1 लाख 35 हजार रुपये, राहुल मुळे विरुद्ध महेश सोनवणे यांच्यात 1 लाख 25 हजार रुपये, धर्मा शिंदे विरुद्ध गिरीराज डूबे यांच्यात 1 लाख 15 हजार रुपये तसेच सोनाली मंडलिक विरुद्ध विशाखा चव्हाण यांच्यात 1 लाख 4 हजार 45 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय अक्षय शिंदे, मोहिन जाफर, भैय्यानाथ जोगी, नकुल पहेलवान यांसारख्या नामांकित मल्लांच्या लढतीही रंगणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते होणार असून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वाजल्यापासून या कुस्ती स्पर्धांना प्रारंभ होणार असून कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis