मूर्तिजापुरातील ब्राह्मण सभेच्या कार्यक्रमात हिंदी–मराठी वाद, कमी उपस्थितीमुळे कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह
अकोला, 08 एप्रिल (हिं.स.)। अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरातील सलासार रिसॉर्ट येथे आयोजित सर्वशाखीय ब्राह्मण सभेच्या कार्यक्रमात भाषेचा वाद आणि कमी उपस्थितीमुळे कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे. मूर्तिजापूर येथील सलासार रिसॉर्टमध्ये सर्वशाखीय ब्राह्मण
मूर्तिजापुरातील ब्राह्मण सभेच्या कार्यक्रमात हिंदी–मराठी वाद, कमी उपस्थितीमुळे कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह


अकोला, 08 एप्रिल (हिं.स.)।

अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरातील सलासार रिसॉर्ट येथे आयोजित सर्वशाखीय ब्राह्मण सभेच्या कार्यक्रमात भाषेचा वाद आणि कमी उपस्थितीमुळे कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.

मूर्तिजापूर येथील सलासार रिसॉर्टमध्ये सर्वशाखीय ब्राह्मण सभेच्या वतीने व्यवसायिकांचा सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले प्रमुख उपस्थित होते.मात्र या कार्यक्रमात हिंदी आणि मराठी भाषेचा वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. हिंदी भाषिक ब्राह्मण समाजातील सदस्यांना कार्यक्रमातून दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचबरोबर, कॅबिनेट मंत्री दर्जा असलेल्या आशिष दामले यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमात स्थानिक आमदार तसेच शहराचे प्रमुख नागरिक मानले जाणारे नगराध्यक्ष यांना निमंत्रण न दिल्याने किंवा त्यांना डावलल्याने विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, मूर्तिजापूर शहरात २५० हून अधिक ब्राह्मण समाजाचे बांधव असताना देखील या कार्यक्रमात अत्यल्प उपस्थिती दिसून आली. अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र समोर आले. यामुळे हा कार्यक्रम अपेक्षित प्रतिसाद मिळवण्यात अपयशी ठरल्याची चर्चा शहरात रंगत आहे. भाषेचा वाद आणि संघटनात्मक मतभेद यामुळेच उपस्थितीवर परिणाम झाला का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे सर्वशाखीय ब्राह्मण सभेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पुढील काळात या वादावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande