
अकोला, 08 एप्रिल (हिं.स.)।
डिजिटल इंडिया अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक व वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (CSC 2.0) योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) यांच्या दि. १९ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार या केंद्रांचे विस्तृत जाळे राज्यभर कार्यरत आहे.
या पार्श्वभूमीवर, मा. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यातील सर्व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ व ‘आधार सेवा केंद्रां’ची सखोल पडताळणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीदरम्यान एकूण १०८ केंद्रांचा पंचनामा करण्यात आला, ज्यामध्ये अनेक केंद्रे त्यांच्या नियोजित ठिकाणी कार्यरत नसणे, सेवा गुणवत्तेमध्ये त्रुटी, तसेच नागरिकांना वेळेत सेवा न मिळणे अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्या.
जर कोणत्याही सेवा केंद्रात अडचणी, गैरसोय किंवा अपूर्ण सेवा आढळल्यास, त्यांनी त्वरित QR कोड स्कॅन करून अथवा दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी.
पारदर्शक व जबाबदार प्रशासनाचा संकल्प!
जिल्हा प्रशासनाचा उद्देश स्पष्ट आहे —
“प्रत्येक नागरिकाला शासकीय सेवा पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळाली पाहिजे.”
या मोहिमेमुळे सेवा केंद्रांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून, डिजिटल प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दिशेने अकोला जिल्हा एक ठोस पाऊल टाकत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे