
अकोला, 08 एप्रिल (हिं.स.)।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, समतेचे विचार प्रत्येकासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा अंगीकार केल्याशिवाय खरी सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी आज इथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मारुती वाठ,जिल्हा जात पळताळणी उपआयुक्त अमोल यावलीकर, सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग अभिजित काळे यांच्यासह सामाजिक न्याय विभाग पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी आदी उपस्थित होते.
श्री.मिटकरी पुढे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी दिलेली समता, बंधुता आणि न्यायाची शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे. समाजातील वंचित, दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणे ही काळाची गरज आहे. सामाजिक समता सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजात जागर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
२०२६-२७ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे १५० वे वर्ष व महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष साजरा करण्यात येणार आहे.
समता सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन
९ एप्रिल रोजी विभागातील सर्व महाविद्यालय,आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे वक्तृत्व, निबंध लघुनाट्य स्पर्धा, १० एप्रिल रोजी समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका ११ एप्रिल रोजी
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष असल्याने महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करणे, महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य या विषयी विविध स्तरावर कार्यक्रम ,१२ एप्रिल रोजी संविधान जागर १३ एप्रिल रोजी जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व नागरिकांचा मेळावा १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन,अकोला येथे संपन्न होणार आहे. तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत अधिनस्त शासकीय कार्यालय, महाविद्यालय, निवासी शाळा, आश्रमशाळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व इतर कार्यक्रम व्याख्यान, चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान मेळावा आयोजित करुन बाबासाहेबांनी शेतक-यांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगणारे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून २० मार्च, २०२६ पासून साजरे करण्यात येत असून त्यानिमित्ताने चवदार तळे येथील सत्याग्रहासंबंधी व त्यानुषंगाने मानवी हक्कांचे महत्व प्रतिपादन करणारे व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे