
चंद्रपूर, 08 एप्रिल (हिं.स.)। शेतक-यांच्या दृष्टीने खरीप हंगाम हा अतिशय महत्वाचा असतो. यावर्षीच्या हंगामाकरीता चंद्रपूर जिल्ह्यासाठी रासायनिक खते आणि बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. आजघडीला जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतक-याला प्राधान्याने खते आणि बियाणे उपलब्ध करून द्यावे. परराज्यातील शेतक-यांना त्याची विक्री करू नये. तसेच खते आणि बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने अलर्ट मोडवर काम करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.
जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या बैठकीत खते आणि बियाणांची जिल्हाकरीता मागणी, आवंटन आाणि उपलब्धता याबाबत आढावा घेतांना त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपुत, आत्माचे संचालक अरुण कुसळकर, सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच फर्टिलायझर्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हा हा सिमावर्ती जिल्हा आहे, असे सांगून जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, खते आणि बियाणांचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे प्रकार निदर्शनास आल्यास त्यावर त्वरीत कारवाई करा. जिल्ह्यात उपलब्ध खतांची आणि बियाणांची बाहेर राज्यात विक्री होणार नाही, याबाबत नियमितपणे तपासणी करावी. तसेच अनधिकृत बियाणे विकले जाणार नाही, याबाबत सजग रहावे. सिमेलगतच्या भागात कृषी आणि पोलिस विभागाने अलर्ट राहून काम करावे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतक-याला त्याच्या मागणीनुसार खते आणि बियाणे उपलब्ध होतील, याची काळजी घ्या. बाहेर राज्यात त्याची विक्री होऊ देऊ नका. बियाणे उगवत नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्या तर कृषी विभागाने त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. तसेच संपूर्ण कृषी यंत्रणेने गावस्तरावर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करावे, अशा सुचनाही जिल्हाधिकारी पंत यांनी दिल्या.
अशी आहे जिल्ह्यातील खते आणि बियाणांची उपलब्धता आणि मागणी -
चंद्रपूर जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2026 करीता एकूण खतांची मागणी 1 लक्ष 99 हजार 900 मे. टन ची असून मंजूर आवंटन 1 लक्ष 80 हजार 800 मे. टन आहे. यापैकी आजघडीला जिल्ह्यात 93335 मे. टन खतांची उपलब्धता आहे. यात युरीया 23409 मे. टन, डीएपी 7502 मे. टन, एमओपी 825 मे. टन, संयुक्त खते 35224 मे. टन आणि एसएसपी 26375 मे. टन आहे. मंजूर आवंटन टप्प्याटप्याने जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तर जिल्ह्यासाठी एकूण 61619 क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली असून यात भात पिकाचे बियाणे 41796 क्विंटल, ज्वारी 270 क्विंटल, तूर 1874 क्विंटल, मूग 12 क्विंटल, उडीद 13 क्विंटल, सोयाबीन 13125 क्विंटल, तीळ 10 क्विंटल, कापूस (बी.टी.) 4519 क्विंटल, कापूस बी.टी (पॅकेट) 9 लक्ष 51 हजार 368 मागणी करण्यात आल्याचे कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपुत यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव