चंद्रपूरातील पाणीटंचाई व स्वच्छता प्रश्नावर मनपा आयुक्तांना निवेदन
- तातडीने उपाययोजना करण्याची भाजपा युवा नेते सुरज पेदुलवार यांची मागणी चंद्रपूर, 08 एप्रिल (हिं.स.)। चंद्रपूर शहरातील वाढती पाणीटंचाई आणि पावसाळ्यापूर्वीच्या स्वच्छतेच्या मुद्द्यावर आज माननीय आयुक्त, महानगरपालिका व माननीय महापौर यांना सविस्तर निव
चंद्रपूरातील पाणीटंचाई व स्वच्छता प्रश्नावर मनपा आयुक्तांना निवेदन


- तातडीने उपाययोजना करण्याची भाजपा युवा नेते सुरज पेदुलवार यांची मागणी

चंद्रपूर, 08 एप्रिल (हिं.स.)।

चंद्रपूर शहरातील वाढती पाणीटंचाई आणि पावसाळ्यापूर्वीच्या स्वच्छतेच्या मुद्द्यावर आज माननीय आयुक्त, महानगरपालिका व माननीय महापौर यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून, प्रशासनाने यावर युद्धपातळीवर काम करावे, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान उन्हाळ्याची तीव्रता पाहता अनेक प्रभागांत पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. नागरिकांची सोय करण्यासाठी पालिकेच्या पाणी टँकरच्या फेऱ्या आणि टँकरची संख्या तात्काळ वाढवण्यात यावी.

भानापेठ प्रभागातील काही भागांत कचरा साचलेला असून अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. हा कचरा त्वरित उचलून परिसर स्वच्छ करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच आगामी पावसाळा लक्षात घेता, शहरातील नाल्यांची सफाई होणे अत्यंत आवश्यक आहे. जर आताच नाल्या उपसल्या नाहीत, तर पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कामे त्वरित पूर्ण करावीत.

प्रलंबित असलेल्या नळ योजनेच्या कामाकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. तांत्रिक अडचणी दूर करून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत नियमित पाणी पोहोचवण्यासाठी ठोस पावले उचलावीत. चंद्रपूरकर सध्या उष्णता आणि पाणीटंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. आयुक्तांनी या निवेदनाची दखल घेऊन सामान्य जनतेला दिलासा द्यावा, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande