क्रिकेट संघटनेच्या निवडणुका होणार; सर्व सभासदांना सदस्यत्व बहाल
छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल, (हिं.स.)। तब्बल दीड दशकाहून अधिक काळ गुंतागुंतीच्या कारणांमुळे वादात अडकलेल्या औरंगाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धर्मदाय आयुक्तांच्या
क्रिकेट संघटनेच्या निवडणुका होणार; सर्व सभासदांना सदस्यत्व बहाल


छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल, (हिं.स.)। तब्बल दीड दशकाहून अधिक काळ गुंतागुंतीच्या कारणांमुळे वादात अडकलेल्या औरंगाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धर्मदाय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जून महिन्यात निवडणुका घ्या, असे आदेश दिल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे आणि अॅड. अजिंक्य जोशी यांनी दिली.

हा निर्णय ऐतिहासिक असून जिल्हा क्रिकेट संघाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. आतापर्यंत सर्व सदस्यांनी संघटनेला उंचीवर नेण्यासाठी योगदान दिले आहे. सध्या १२ सदस्य व खेळाडू एमसीएच्या विविध पदांवर कार्यरत आहेत, असे सचिन मुळे यांनी सांगितले.

संघटनेची शेवटची निवडणूक २००८ मध्ये झाली होती. २००९ मध्ये निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर काही सभासदांचे सदस्यत्व रद्द झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले आणि निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. दरम्यान, २७ फेब्रुवारी २०२६ला झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सर्व सभासदांचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्याचा ठराव करण्यात आला आणि या बैठकीत सर्व सदस्यांनी एकत्र येत निवडणुका घेण्याबाबत एकमत दर्शविले होते. त्यानुसार न्यायालयात विनंती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने सर्व सभासदांना सदस्यत्व बहाल करत धर्मदाय आयुक्तांच्या देखरेखीखाली जून २०२६ अखेरपर्यंत निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande