
बोलता ऐकता येत नाही मात्र जिद्द कायम..खेळाडूनी जिंकले सर्वांचे मन
मनमाड, 08 एप्रिल (हिं.स.)।
- मैदानात शांतता, पण जिद्द मात्र ओसंडून! मनमाडमध्ये मूकबधिर खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेने जिंकली सर्वांची मने जगासाठी ते बोलू शकत नाहीत किंवा ऐकू शकत नाहीत, पण त्यांच्या बॅटचा तडाखा आणि चेंडूचा वेग आज खूप काही सांगून गेला. निमित्त होते नांदगाव तालुका मूकबधिर संघटनेतर्फे आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे. या स्पर्धेने केवळ खेळाचा आनंदच दिला नाही, तर 'अपंगत्वावर मात करण्याची जिद्द काय असते', याचे जिवंत उदाहरण समाजासमोर मांडले.या क्रिकेट सामन्यात शब्दाविना संवाद आणि खेळाचा अनोखा थरार बघायला मिळाला मैदानावर इतर सामन्यांसारखा प्रेक्षकांचा आरडाओरडा नव्हता की कॉमेंट्रीचा आवाज. तिथे होता तो फक्त हातांच्या हालचालींचा संवाद आणि डोळ्यांतील जिंकण्याची चमक. प्रत्येक धाव घेतल्यावर किंवा विकेट पडल्यावर खेळाडूंनी व्यक्त केलेला आनंद पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. शब्दांची साथ नसली तरी त्यांच्यातील सांघिक भावना कोणत्याही सराईत संघापेक्षा कमी नव्हती.
आम्ही ऐकू शकत नाही म्हणून काय झाले, आम्ही स्वप्न पाहू शकतो आणि ती पूर्णही करू शकतो, हाच संदेश या स्पर्धेतून मिळाला. अनेक अडचणींवर मात करत या खेळाडूंनी मैदानावर जे कौशल्य दाखवले, त्यासमोर शारीरिक अक्षमता फिकी पडली. नांदगाव तालुक्यातील या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.खेळ केवळ हार-जितीसाठी नसून तो जगण्याची उमेद देतो, हेच या मूकबधिर बांधवांनी आपल्या खेळाडवृत्तीतून सिद्ध करून दाखवले. त्यांच्या या ध्येयवेड्या प्रवासाला उपस्थित सर्वांनी उभे राहून दाद दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV