
लातूर, 08 एप्रिल (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यात ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा प्रसार तसेच महामानवांच्या विचारांचा जागर केला जाणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार व सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सप्ताहाचे उद्घाटन ८ एप्रिल रोजी करण्यात आले असून, तालुकास्तरावर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप सुरू करण्यात आले आहे. महाड चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक आंदोलनाच्या शताब्दी वर्षानिमित्त ९ एप्रिल रोजी महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांमध्ये मानवी हक्कांवर आधारित व्याख्याने, निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
१० एप्रिल रोजी ‘समतादूत’ उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्यांद्वारे शासकीय योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच ‘मार्जिन मनी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष असल्याने ११ एप्रिल रोजी त्यांच्या कार्यावर आधारित विशेष कार्यक्रम वसतिगृहे व निवासी शाळांमध्ये घेण्यात येतील. १२ एप्रिल रोजी ‘संविधान जागर’ उपक्रमांतर्गत संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांवर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. महिला मेळाव्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी महिलांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली जाणार आहे.
१३ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर व मेळावा आयोजित करण्यात येणार असून, जिल्हा आरोग्य विभागाच्या सहकार्याने रक्तदान शिबिरेही घेण्यात येतील.
१४ एप्रिल रोजी जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रम, चर्चासत्रे तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी शेतकरी व सर्वसामान्यांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात येईल. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे.
या सप्ताहातील सर्व उपक्रमांमध्ये नागरिक, विद्यार्थी व लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आज दुपारी पत्रकार परिषदेत समाज कल्याण विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis