
डोंबिवली, 08 एप्रिल, (हिं.स.)। एमआयडीसी निवासी परिसरातील बहुतेक रस्ते काँक्रिटचे करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर नाले, गटारे आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कारणास्तव हे रस्ते पुन्हा खोदण्यात आले आहेत. वीज व पाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे ठेकेदारांकडून सांगितले जात आहे. मात्र हे सर्व रस्ते पूर्ववत करण्यात येणार का, असा प्रश्न येथील रहिवाश्यांना पडला असून, त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या एमआयडीसी ठेकेदाराकडून नवीन नाले, गटारी, सांडपाणी वाहिन्या यासाठी मोठ्या प्रमाणात निवासी भागात कामे चालू आहेत. वीज, महानगर गॅस, पाणी इत्यादी वाहिन्या ठेकेदाराकडून कामाच्या वेळी फुटल्याने त्याचा त्रास, फटका जनतेला बसत आहेच. परंतु ही कामे पूर्ण झाल्यावर फोडलेला काँक्रीट रस्ता हा ठेकेदाकडून पूर्ववत केला जात नाही. याबद्दल ठेकेदार आणि एमआयडीसी प्रशासनाकडून फक्त आश्वासन दिले जात आहे. एमआयडी विभागातील पोटोबा हॉटेल वळणावरील ग्रीन्स स्कुल जवळ असाच काँक्रीट रस्ता हा नवीन नाला बनविण्यासाठी तोडण्यात आला होता. तसेच निवासी भागातील जवळपास सहा रस्ते आता पर्यंत तोडण्यात आले आहेत. या सर्व रस्त्यावरील नाले, गटारी इत्यादीची कामे पूर्ण झाल्यावर हे रस्ते ठेकेदाराकडून पून्हा पूर्ववत करण्यात आले नाही. परिणामी यामुळे या वर्षी पावसाळ्यात याचा फटका जनतेला तसेच वाहचालकांना बसणार आहे.
प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारमुळे याचा त्रास जनतेला होत असून रस्ते दुरुस्तीचा भुर्दंड हा शेवटी जनतेलाच बसणार आहे. एमआयडीसी, केडीएमसी प्रशासनाने तातडीने हे रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करून पूर्ववत करावे अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.
----------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi