
अमरावती, 08 एप्रिल, (हिं.स.) प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे सध्या हिमालयाच्या डोंगररांगांमध्ये ट्रेकिंगचा आनंद घेत आहेत. या मोहिमेदरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच चर्चेत आला आहे. यामध्ये त्यांनी निसर्गाच्या वर्णनासोबतच आपल्या राजकीय प्रवासावर आणि तत्वांवर भाष्य करत विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
व्हिडिओमध्ये बच्चू कडू एका उंच कड्यावर उभे असून त्यांच्या मागे बर्फाच्छादित हिमालयाची शिखरे दिसत आहेत. यावेळी बोलताना कडू म्हणाले, मी सह्याद्री पर्वत फिरलो आहे. पन्हाळा-पावनखिंड फिरताना पावसाच्या सरी कोसळायच्या, तेव्हाची आठवण इथे येत आहे. रायगड चढताना जे कष्ट जाणवायचे, त्याची आठवण ‘नामचे बाजार’ चढाईच्या वेळी होत आहे. सह्याद्रीत प्रचंड उष्णता असते, तर इथे तेवढीच थंडी आहे, असे म्हणत त्यांनी दोन्ही भौगोलिक परिस्थितीची तुलना केली आहे.
प्रामाणिकपणा विरूद्ध बेइमानी
बच्चू कडू यांनी यावेळी सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याची संधी सोडली नाही. सध्या त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून आरोप केले जात आहेत. भाजपचे अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या चुलत बंधूच्या तक्रारीवरून कडू यांच्यासह तिघांविरूद्ध जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चू कडू म्हणाले, जशी आकाश आणि पर्वताची स्पर्धा आहे, तशीच स्पर्धा आज बेईमानीने जगणारे लोक आणि प्रामाणिकपणे जगणारे लोक यांच्यात आहे. आम्हाला या स्पर्धेत जिंकून सर्वांना समतेच्या प्रवाहात आणायचे आहे. ज्याचे कष्ट जास्त, त्याला भागीदारीही जास्त मिळाली पाहिजे, हा विचार घेऊनच आम्ही पुढे चाललो आहोत.बच्चू कडू म्हणाले, हिमालय जणू आकाशाशी स्पर्धा करत आहे. अशा या बुद्धभूमीमध्ये आम्ही भगवद्गीता आणि भारतीय संविधान सोबत घेऊन एव्हरेस्टच्या बेस कॅम्पकडे जात आहोत. ही एक चांगली अनुभूती आहे.
बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच आरोपांचे खंडन करताना बच्चू कडू यांनी हिमालयाच्या मोहिमेविषयी माहिती दिली होती. हे नियोजन १५ ते २० दिवसांपुर्वीच झाले होते. त्यामुळे मी पळून गेलो, असा अर्थ कोणीही काढू नये. मी संविधान सोबत घेऊन या मोहिमेवर जात आहे. आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत. कोणाचा जीव घेणारे नाहीत. शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी मी लढत राहीन, मी अटकेला घाबरत नाही, असे बच्चू कडू म्हणाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी