
लातूर, 08 एप्रिल (हिं.स.)।
शिवली येथील जागृत श्री हनुमान देवस्थानाच्या कृपेने आपण विधानसभेत पोहोचलो असून, या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही भाजपाचे नेते व लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांनी दिली.
औसा तालुक्यातील भादा सर्कलमधील शिवली गावात श्री हनुमान मंदिर परिसरात आमदार निधीतून सुमारे १५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या भव्य सभा मंडपाचे लोकार्पण आ. कराड यांच्या हस्ते रविवारी भक्तिमय वातावरणात पार पडले.
या प्रसंगी विक्रमकाका शिंदे, पद्माकर चिंचोलकर, संदिपान शेळके, शरद दरेकर, रविंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
आ. कराड यांच्या आगमनावेळी गावकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीसह जोरदार स्वागत केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,
पूर्वी विधान परिषदेचे आमदार असताना त्यांनी या सभामंडपासाठी निधी दिला होता. आज त्या निधीतून भव्य सभागृह उभे राहिले असून, मारुती रायाच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या सहकार्याने आपण विधानसभेत पोहोचलो.
पुढील काळात शिवली गावातील सर्व मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास शिवली व परिसरातील भाविक, महिला-पुरुष, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis