
नाशिक, 08 एप्रिल (हिं.स.) : सिंहस्थ कुंभ २०२७ च्या पार्श्वभूमीवर घाटांवरील तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि गर्दी व्यवस्थापन व पायाभूत सुविधांची गरज तपासण्यासाठी मंगळवारी गोदावरी नदीलगतच्या प्रमुख घाटांची विविध विभागांच्या संयुक्त पथकाने पाहणी केली.
या पाहणीसाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, तसेच नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री उपस्थित होते. याशिवाय महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महावितरण, तसेच तांत्रिक भागीदारांचे अधिकारीही पाहणीत सहभागी झाले होते.
या पाहणीदरम्यान होळकर पूल ते नारोशंकर मंदिर पूल, पुढे वीर सावरकर पूल, टाकळेश्वर परिसर आणि पुढे लक्ष्मीनारायण घाटापर्यंतच्या विविध घाट भागांची तपासणी करण्यात आली. दोन्ही काठांवरील प्रमुख पट्ट्यांचा समावेश करून नागरिकांच्या हालचालींचा अभ्यास तसेच विद्यमान अडचणींचा आढावा घेण्यात आला.
अधिकाऱ्यांनी प्रवेश व निर्गमन मार्ग, पादचारी वाहतूक, होल्डिंग एरिया, तसेच संभाव्य अडथळ्यांची पाहणी केली. विद्यमान सुविधांची स्थिती, आवश्यक दुरुस्ती, रुंदीकरण व अतिरिक्त सुविधांची गरज यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.यापुढील काही दिवसांत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील इतर घाट व प्रस्तावित स्थळांचीही पाहणी करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV