
कोल्हापूर, 08 एप्रिल (हिं.स.)। चंदगड तालुका आणि परिसरातील अनेक गावात वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती व पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी हतबल झाले आहेत. हत्ती, बिबट्या, रानडुक्कर, अस्वल व माकडे आदी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत गेल्या काही वर्षांत अनेक निष्पाप नागरिकांनी जीव गमावल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, पिकांचे नुकसान आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यावर सखोल चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जंगलात वन्यप्राण्यांसाठी चारा व पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे, वड, पिंपळ, जांभूळ, हिरडा, चिंच यांसारख्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करणे यांचा समावेश होता. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून योग्य व जलद नुकसानभरपाई देणे, जंगलालगतच्या जमिनींसाठी विशेष मोबदला देणे, तसेच जंगलाभोवती खंदक, सौर कुंपण यांसारख्या उपाययोजना करून वन्यप्राण्यांचा शेतात प्रवेश रोखण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय धनगरवाडे–कोलिक–झांबरे मार्गे बांदा रस्त्यासाठी वनविभागाची परवानगी देणे, गड-किल्ले व धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मंजुरी, वन पर्यटनाला चालना देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच उपद्रवी वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदूक परवाना देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली.
या सर्व मागण्यांवर वनमंत्री गणेश नाईक यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. चंदगड मतदारसंघातील शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी लवकरच ठोस उपाययोजना राबविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीस लक्ष्मण गावडे, दिग्विजय देसाई, डी. एल. भादवणकर, सट्टुपा पेडणेकर, रघुवीर शेलार, सुरेश हरेर, कृष्णा पाटील, सदानंद गावडे, जोतिबा तेजम, मच्छिंद्र नाळवे, उत्तम भादवणकर, प्रकाश गावडे यांसह अनेक शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar