
जळगाव, 08 एप्रिल (हिं.स.) सहायक प्रशिक्षण सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र (BTRI) जळगाव यांच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर योजनेतील विविध व्यवसायांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेतंर्गत (PM National Apprenticeship Mela) भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भरती मेळावा दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नॅशनल हायवे क्रमांक-६, तंत्रनिकेतन समोर, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिकाऊ उमेदवारी योजनेत प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक प्रशिक्षण सल्लागार कार्यालयाकडून करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यात जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
दहावी, बारावी, शिल्पकारागीर योजना (ITI), डिप्लोमा तसेच पदवी (Degree) उत्तीर्ण उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. या भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांनी वरील दिनांक व वेळेनुसार उपस्थित राहून PM National Apprenticeship Mela चा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रशिक्षण सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, जळगाव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर