रत्नागिरी जिल्हा बँक राज्यात दुसऱ्या क्रमांकाची - अध्यक्ष डॉ. चोरगे
रत्नागिरी, 8 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षी ३२ कोटी ९ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेमध्ये आर्थिक शिस्त आणताना ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून बँकेचा देण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे आज जिल्हा बँकेची
रत्नागिरी जिल्हा बँक अध्यक्ष पत्रकार परिषद


रत्नागिरी, 8 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षी ३२ कोटी ९ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेमध्ये आर्थिक शिस्त आणताना ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून बँकेचा देण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे आज जिल्हा बँकेची स्थिती भक्कम असून, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाची जिल्हा बँक म्हणून नावारूपाला आली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, बँकेची स्थापना २४ मे १९५७ रोजी झाली. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा असा एकत्रित होता. बँकेचे भागभांडवल ८७,८५५ रुपये होते. शासनाने १ लाखाचे भागभांडवल मंजूर केले. त्यानंतर जिल्ह्याबरोबरच बँकेचे विभाजन झाले. बँकेचे कार्यक्षेत्र मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या ९ तालुक्यातून ७५ शाखा, १ विस्तार कक्ष व प्रधान कार्यालय असे विस्तारलेले आहे. बँकेच्या बहुतांश शाखा ग्रामीण भागातील तळागाळात कार्यरत आहेत.

बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी २००७ साली बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक अडचणीवर मात करून बँकेने आपले वेगळे स्थान महाराष्ट्र राज्यात व सहकार क्षेत्रात निर्माण केले आहे. सन २००७ मध्ये बँक तोट्यात होती. साखर कारखान्यांसह विविध कर्जे मोठ्या प्रमाणात थकित झाली होती. त्यामुळे एनपीए भरमसाट वाढला होता. नाबार्ड, आरबीआय व सहकार खाते यांनी बँकेचे सोनेतारण कर्ज वगळता अन्य सर्व प्रकारच्या कर्ज वितरणावर स्थगिती आणली होती. त्यावेळी भागभांडवल २१.५९ कोटी, निधी ४१.९४ कोटी, ठेवी ४८७.५२ कोटी, कर्जे ३०७.५५ कोटी, एकूण व्यवसाय ७९५.०७ कोटी, संचित तोटा ९.१४ कोटी ढोबळ एनपीए १९.८३ व निव्वळ एनपीए १३.६१ टक्के अशी बँकेची अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती होती. अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी यांच्या मदतीने हळूहळू काम सुरू केले आणि अनेक योजना अभ्यासपूर्ण पद्धतीने राबविल्या. आज बँकेची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे. बँकेमध्ये आर्थिक शिस्त लावून बँकेला एका विशिष्ट पातळीवर नेऊन ठेवले आहे. बँकेत २०१२ मध्ये कोअर बँकिंग प्रणाली सुरू केल्याने ग्राहकांना जलद सेवा उपलब्ध झाली. बँकेमध्ये आयटी विभाग सुरू करून उपलब्ध करून दिल्या. एटीएमसह अत्याधुनिक सेवा ग्राहकांकरिता सुरू करण्यात आल्या. सन २०२३-२४ मध्ये बँकेने सहकारी संस्थांना ३० टक्के लाभांश दिला. एवढा लाभांश देणारी रत्नागिरीची जिल्हा बँक देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. बँकेची एकूण २६ स्वमालकीची शाखा कार्यालये आहेत. त्यापैकी २२ शाखा कार्यालये डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील आहेत.

बँकेला मिळालेल्या राज्य शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कार (२०१५-१६), सहकार भूषण पुरस्कार (२०१७-१८) या पुरस्कारांसह एकूण २० प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. सलग १५ वर्षे ऑडिट वर्ग अ, सलग १४ वर्षे निव्वळ एनपीए ० टक्के, सलग १८ वर्षे नफ्यात असलेली रत्नागिरी जिल्हा बँक प्रगतीपथावर असून अत्यंत भक्कम आर्थिक स्थितीत आहे. बँकेने ग्राहकांसाठी जिल्ह्यात १९ ठिकाणी एटीएम सेंटर कार्यान्वित केली आहेत. मोबाइल एटीएम व्हॅन सुविधा कार्यान्वित केली आहे. ती जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील जनसमुदायाच्या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध करून त्याद्वारे बँकेच्या विविध ठेवी व कर्जयोजनांबाबत ग्राहकांना माहिती देण्यात येते.

बँकेमार्फत प्राथमिक विकास संस्थांचे पदाधिकारी व सचिवांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत प्रशिक्षण आयोजित केले जाते. काही जणांना निवासी प्रशिक्षणही देण्यात आले. प्रगतिशील सहकारी संस्थांना भेटी देण्याकरिता अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते. त्यासाठी अर्थसाह्यही केले जाते.

जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे व महापूरामूळे नुकसान झालेले शेतकरी, छोटेमोठे उद्योजक व शैक्षणिक संस्थांना २५लाखापर्यंत ५ टक्के दराने कर्जपुरवठा करण्यात आला आहे. बँकेतर्फे १०० संगणक संच जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळांना देण्यात आले. बँकेमार्फत जिल्ह्यातील ३० जिल्हा परिषद शाळांना सोलार युनिट संच देण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande