
रायगड, 08 एप्रिल (हिं.स.)। आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना देणे तसेच समाजातील विविध संवेदनशील विषयांवर जनजागृती घडवून आणणे या उद्देशाने रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दि. ८ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत ही कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सदर कार्यशाळेत शिक्षण व करिअर मार्गदर्शन, बालविवाह प्रतिबंध, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना योग्य दिशादर्शन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी (कर्जत) राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक (नेरळ) राहुल वरोटे तसेच ‘भरोसा सेल’च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांचीही उपस्थिती असून इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात पाहुण्याचे स्वागत स्वागत माधवराव गायकवाड यांनी केले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना ‘गुड टच-बॅड टच’, संकटसमयी योग्य निर्णयक्षमता, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची पावले तसेच महत्त्वाचे आपत्कालीन संपर्क क्रमांक याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाच्या दृष्टीने कबड्डी सारख्या क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
ही कार्यशाळा मधुरम चारिटेबल ट्रस्ट संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, माणगाव वाडी (जुमापट्टी) ता. कर्जत, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमास विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
तसेच आदिवासी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व शासकीय सेवेत कार्यरत व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि सातत्य राखण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)