
बीड, 08 अप्रैल (हिं.स.) : बीड नगर परिषदेत स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार थेट बँक खात्यात देण्यास तसेच त्यांना विमा संरक्षण देण्यास मागणी केली. या मागणीची दखल घेत नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी शासनाने घालून दिलेल्या किमान वेतन कायद्याप्रमाणे पुढील काळात कंत्राटी कामगारांना वेतन देण्याचा ठराव स्थायी समितीत पारित केला.
स्थायी समितीच्या बैठकीत स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातील लेबर टेंडर प्रक्रियेला मंजुरी देताना आ. विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अमर नाईकवाडे यांनी कंत्राटी कामगारांचा मुद्दा उपस्थित केला. नगर परिषदेत कार्यरत कंत्राटी कर्मचारी विविध विभागांमध्ये महत्त्वपूर्ण सेवा बजावत असून त्यांचे वेतन अपुरे असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क असून वेतन थेट बँक खात्यात जमा करावे, तसेच स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातील जोखमींमुळे सर्व कंत्राटी कामगारांचा विमा उतरवावा, असेही त्यांनी ठामपणे मागणी केली.
या निर्णयामुळे बीड नगर परिषदेत कार्यरत कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेत वाढ होईल. किमान वेतन मिळाल्यास कामगारांच्या जीवनमानात सुधारणा होऊन कामकाजात अधिक स्थैर्य निर्माण होईल, असा विश्वास अमर नाईकवाडे यांनी व्यक्त केला.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis