
सोलापूर, 08 एप्रिल (हिं.स.)। सोलापूरच्या सामाजिक क्षेत्रातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शिरीष भैय्याजी जगदाळे यांनी आज आपल्या समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. राज्याचे उप मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब व युवकांचे अशा स्थान खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख खासदार धैर्यशील माने साहेब यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी खासदार धैर्यशील माने साहेब यांनी जगदाळे यांचे भगवा उपरणे घालून स्वागत केले आणि त्यांच्यावर सोलापूर शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काम करण्याचे सांगितले.
प्रवेशाचे मुख्य कारण आणि पार्श्वभूमी
शिरीष भैय्या जगदाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सोलापूर शहरात सक्रिय आहेत. विशेषतः मराठा आरक्षण आंदोलन, तरुणांचे प्रश्न आणि नागरी समस्यांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामाच्या धडाक्यावर विश्वास ठेवून आपण हा निर्णय घेतल्याचे जगदाळे यांनी यावेळी सांगितले.
केवळ राजकारण नव्हे, तर समाजकारण करण्यासाठी सत्तेचा योग्य वापर व्हावा या विचाराने मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वसामान्यांसाठीचे काम आणि शिवसेनेचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड