
ठाणे, 08 एप्रिल (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या ३१ वारसांना वारसा हक्क व मयत कर्मचा-याच्या ०३ वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत नियुक्ती देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना गटनेते पवन कदम यांनी ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे व अनुकंपा तत्त्वावरीलही नियुक्त्या करण्यासंदर्भात्त मुद्दा उपस्थित केला होता.
याबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाशी चर्चा करुन या नियुक्त्या त्वरीत करण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार नुकतेच ३४ वारसांना वारसा हक्काने आणि ०३ वारसांना अनुकंपा तत्वावर असे एकूण ३४ वारसांना नियुक्ती पत्रे प्रशासनामार्फत देण्यात आली.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सेवानिवृत्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसातत्वाने नोकरी देण्याबाबतची प्रक्रिया गतीमान पध्दतीने सुरू असून कागदपत्रांची पुर्तता केल्यावर संबंधितांना प्राधान्याने नियुक्तीपत्रे दिली जाणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
महापौर शर्मिला पिंपळोलकर व शिवसेना गटनेते पवन कदम यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कर्मचारी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर