
लातूर, 08 एप्रिल (हिं.स.)।
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील चामरगा–बोळेगाव पाटीदरम्यान कारची समोरासमोर भीषण धडक होऊन एक हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात उदगीर येथील डोईजोडे कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातात मोहिनी वैजनाथ डोईजोडे (वय 75) यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्या आपल्या कुटुंबियांसह उदगीरहून लातूरकडे प्रवास करत होत्या. येरोळ मोडजवळ हा अपघात झाला.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन वर्षांपूर्वी याच कुटुंबातील बालाजी आणि महेश डोईजोडे हे दोन सख्खे भाऊ गाणगापूर येथे देवदर्शनासाठी गेले असताना नदीपात्रात बुडून एकाच दिवशी मृत्यूमुखी पडले होते. त्या दु:खातून कुटुंब सावरत असतानाच आता त्यांच्या आईचाही अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात प्राचार्य अॅड. राजकुमार नावंदर, कनिका बाबुराव डोईजोडे तसेच दुसऱ्या कारमधील उदगीर येथील मलगे कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उदगीरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या सलग दुःखद घटनांमुळे डोईजोडे कुटुंबावर काळाने पुन्हा एकदा क्रूर आघात केल्याची भावना व्यक्त होत असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis