
नंदुरबार, 08 एप्रिल (हिं.स.) महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी' (अमृत) मार्फत
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात
आले आहे. अमृतच्या लक्षित गटातील कुटुंबांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आणि भविष्यातील योजनांचे
नियोजन करण्यासाठी 08 ते 25 एप्रिल या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये 'अमृत
परिवार सर्वेक्षण अभियान' राबविण्यात येत असल्याची माहिती 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण
प्रबोधिनी' नंदुरबारचे जिल्हा व्यवस्थापक योगश अहिरे यांनी कळविली आहे.
सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश
या सर्वेक्षणामागे अमृत संस्थेचा दुहेरी हेतू आहे. पहिला म्हणजे, लक्षित गटातील कुटुंबांची नेमकी संख्या
निश्चित करणे आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेणे. दुसरा उद्देश म्हणजे, उपलब्ध स्थानिक संसाधने आणि
लोकांच्या आवडीनुसार नवीन रोजगारक्षम व शैक्षणिक योजना तयार करणे. या माध्यमातून जास्तीत जास्त
कुटुंबांपर्यंत संस्थेच्या सध्याच्या योजनांची माहिती पोहोचवण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
कोणत्या जातींचा समावेश ?
अमृत संस्थेच्या लक्षित गटामध्ये सध्या खुल्या प्रवर्गातील एकूण 25 जातींचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने:
ब्रमण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ,
अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी,
कोमटी/वैश्य इत्यादी जातींचा समावेश आहे. सर्वेक्षणाअंती या यादीत वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात
आली आहे .
अमृतमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना
सध्या ही संस्था लक्षित गटासाठी खालील प्रमुख योजना राबवत आहे:
व्यक्तिमत्व व कौशल्य विकास: औद्योगिक आणि रोजगारक्षम प्रशिक्षण.
शिक्षण: उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाह्य.
स्पर्धा परीक्षा: स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन.
स्वयंरोजगार: उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी वैयक्तिक व्याज परतावा योजना.
सहभागाचे आवाहन
या सर्वेक्षण काळात अमृतचे प्रतिनिधी थेट कुटुंबांशी आणि विविध सामाजिक संस्था, संघटना व मंडळांशी संपर्क
साधणार आहेत. लक्षित गटातील जास्तीत जास्त व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी या सर्वेक्षणात आपली माहिती
नोंदवून शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा व्यवस्थापक श्री. अहिरे
यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अमृतच्या जिल्हा व्यवस्थापकांशी 9112228771 या
क्रमांकावर संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर