
नांदेड, 09 एप्रिल, (हिं.स.)। जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जन औषधवैद्यकशास्त्र विभागातर्फे सर्वरोग निदान व उपचार शिबिर” नांदेड तालुक्यात गोपाळचावडी येथे उत्साहात पार पडले.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पदवीपूर्व (एम.बी.बी.एस.) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फॅमेली ऑडॉप्शन प्रोग्राम हा भाग शैक्षणिक वर्षात समाविष्ट केला असल्याने ग्रामिण भागातील प्रत्यक्ष आरोग्य समस्या समजून घेण्याची आणि त्यावर उपपाययोजना करण्याची संधी मिळावी तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णसेवा, गृहभेटींचा अनुभव, आरोग्य जनजागृती व समुपदेशनामध्ये सक्रिय सहभाग घेता यावा त्यामुळे त्यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक भान अधिक वृध्दिंगत होण्यास मदत होणार असून भविष्यातील वैद्यकीय सेवेबाबत त्यांची दृष्टी अधिक व्यापक होईल, या हेतूने महाविद्यालयातील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्यावतीने गोपाळचावडी गावाची निवड केलेली आहे.
ग्रामिण भागातील नागरीकांना दर्जेदार, सुलभ व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात उपस्थित ग्रामस्थांची पुर्णपणे विनामुल्य तपासणीसोबतच औषधोपचार व रक्त चाचण्या देखील मोफत करण्यात आल्या.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त दरवर्षी आरोग्यविषयक महत्वाच्या मुद्यावर भर दिला जातो. यंदाच्या दिनाचे ब्रीदवाक्य टुगेदर फॉर हेल्थ, स्टॅड विथ सायन्स ( आरोग्यासाठी एकत्र येऊया, विज्ञानाच्या बाजूने उभे राहू या) या संकल्पनेवर आधारीत असून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे, चुकीच्या समजुती दुर करणे व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा बळकट करणे हा मुख्य उद्देश होता. या अनुषंगाने शिबिरात नागरिकांना योग्य जीवनशैली, नियमित तपासणी व लवकर निदान यांचे महत्व समजावून सांगण्यात आले.
या शिबिरात स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, बालरोगशास्त्र, नेत्ररोग, कान-नाक-घसा शास्त्र शल्यचिकीत्साशास्त्र, त्वचारोगशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र अशा विविध विभागाच्या तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. एकाच छताखाली विविध तज्ञांची उपलब्धता असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला. शेकडो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला असून लहान मुले, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रौढ यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदविला गेला. अनेक रुग्णांना प्रथमच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
हे शिबिर या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदशनाखाली संपन्न झाले असून, शिबिराचे उद्घाटन मानसोपचारशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. आय. एफ इनामदार प्राध्यापक व विभाग प्रमुख, जन औषधवैद्यकशास्त्र विभाग, डॉ. चंदुलिया विभागप्रमुख औषधशास्त्र विभाग, डॉ. वंदना दुधमल विभागप्रमुख शरीरक्रियाशास्त्र विभाग, डॉ. सलीम तांबे सहयोगी प्राध्यापक बालरोगशास्त्र विभाग, डॉ. आर. डी. गाडेकर सह. प्रा. जन औषधवैद्यकशास्त्र विभाग, डॉ. ज्योती भिसे, डॉ. कोमल वारकड सहा.प्राध्यापक ज. औ. शास्त्र विभाग यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी ग्रामीण आरोग्य सेवेमध्ये अशा उपक्रमाचे महत्व अधोरेखित करतांना भविष्यातही अधिक व्यापक स्तरावर अशा शिबिराचे आयोजन करण्याची गरज व्यक्त केली.
शिबिरादरम्यान माहिती, शिक्षण व संवाद उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला. पदविपुर्व विद्यार्थी व अंतरवासिता डॉक्टर यांनी तयार केलेले हस्तनिर्मीत पोस्टर प्रदर्शनासाठी लावण्यात आली होती. या माध्यामातून विविध आजाराबाबत जनजागृती करण्यात आली तसेच योग्य आहार, व्यायाम स्वच्छता व नियमित तपासणी याचे महत्व अधोरेखित करण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील या उपक्रमात मोलाचे योगदान दिले. महालॅबच्या माध्यमातून रक्ततपासण्या करण्यात आल्या. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर निदान होऊन योग्य उपचार मिळण्यास मदत झाली. ग्रमिण भागात अशा सुविधा सहज उपलब्ध नसल्याने या सेवेचे विशेष कौतुक करण्यात आले. काही रुग्णामध्ये दिर्घकालीन आजाराचे लवकर निदान झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
हे शिबिर श्री जगद्गुरु पंचाचार्य हायस्कूल गोपाळचावडी येथे आयोजित करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी यांनी या उपक्रमासाठी मनापासून सहकार्य केले. तसेच श्री. मुंडकर यांनीही शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले. शाळेच्या परिसरात उकृष्ट नियोजन, नोंदणी व्यवस्था, तपासणी कक्ष व औषधवितरण कक्ष यांची प्रभावी मांडणी करण्यात आल्यामुळे शिबिर सुरळीत पार पाडले. शिबिरात विविध वयोगटातील रुग्णाची तपासणी करुन त्यांना आवश्यक त्या उपचाराचा लाभ देण्यात आला. महिलासाठी स्त्रीरोग तपासणी, गर्भवतीसाठी सल्ला, बालकांसाठी आरोग्य तपासणी व लसीकरणाविषयी मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सल्ला तसेच सामान्य आजारसाठी तज्ञांचे मार्गदर्शन देण्यात आले. अनेक नागरिकांनी शिबिरामुळे वेळ व खर्चाची बचत झाल्याचे नमुद केले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis