
पुणे, 09 एप्रिल (हिं.स.) : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि पशुपालन क्षेत्रात आधुनिकतेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी शुक्रवारी, 10 एप्रिल 2026 रोजी पशुसंवर्धन आयुक्तालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाच्या 9 मार्च 2026 रोजीच्या सुधारित निर्णयानुसार ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, ती मंत्री पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल श्रीमती पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या कार्यक्रमाला सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन. (भा.प्र.से.) आणि पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यशाळेत राज्यभरातील जिल्हा व प्रादेशिक पशुसंवर्धन उपायुक्त सहभागी होणार असून, ग्रामपातळीवर योजनेची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रम पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू सभागृहात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे.
‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ ही ग्रामीण महाराष्ट्रातील पशुपालकांसाठी आर्थिक व सामाजिक विकासाचे प्रभावी साधन ठरणार आहे. या योजनेद्वारे ग्रामीण युवकांना पारंपारिक पशुपालनाकडे केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर आधुनिक उद्योजकतेच्या दृष्टीकोनातून पाहण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.
दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन तसेच शेळी-मेंढी पालनासाठी तांत्रिक व आर्थिक सहाय्य देऊन ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढविणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच पशुपालनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनक्षमता वाढविणे आणि स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे यावरही भर दिला जात आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण विकास प्रक्रियेला वेग मिळेल, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सांगितले की, ही योजना ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या व्यापक ध्येयाच्या पूर्ततेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असून ग्रामीण भागाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीस चालना देईल.
00000000000000000000000
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु