
अकोला, 09 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार दिलीप स्वामी यांनी आज स्वीकारला.हा पदभार जिल्हाधिकारी,तथा प्रभारी व्यवस्थापकीय संचालक महाबीज अकोला, वर्षा मीना यांच्या हस्ते औपचारिकरित्या स्वीकारण्यात आला. या प्रसंगी मान्यवर उपस्थित होते.
श्री. स्वामी यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी म्हणून अत्यंत प्रभावी व उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रशासनात पारदर्शकता, वेगवान निर्णयप्रक्रिया आणि जनतेशी सुसंवाद यावर विशेष भर देण्यात आला होता.त्यांच्या प्रशासनातील व्यापक अनुभव, कार्यतत्परता आणि दूरदृष्टीमुळे महाबीजच्या कार्याला नवी दिशा आणि गती मिळेल, तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे