
चंद्रपूर, 09 एप्रिल (हिं.स.)। आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पेट्रोलियम पदार्थ, घरगुती सिलिंडरची मागणी, एजन्सीकडून होत असलेला पुरवठा, ग्राहकांना रोज वाटण्यात येणा-या सिलिंडरची संख्या आदी बाबी तपासण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी गॅस एजन्सी व सिलिंडरच्या गोदामला अकस्मिकपणे भेट दिली. यावेळी त्यांनी एजन्सीमध्ये असलेल्या स्टॉक रजिस्टरची पाहणी केली. तसेच भटाळी येथील गोदामला भेट देऊन प्रत्यक्ष भरलेले आणि रिकामे सिलिंडरची आकडेवारी घेतली.
दीक्षाभुमी जवळ असलेल्या चेतक गॅस एजन्सीला गुरुवारी भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी पंत यांनी सुरुवातीला स्टॉक रजिस्टरची पाहणी केली. एजन्सीमध्ये उपस्थित असलेल्या ग्राहकांचे काम थांबवू नका, त्यांचे काम नियमितपणे करा, अशा सुचना एजन्सीच्या कर्मचा-यांना दिल्या. रोज किती ग्राहकांची बुकींग होते, सिलिंडर कसे उपलब्ध करून देता, रोजचा स्टॉक किती, यात घरगुती आणि व्यावसायिक सिलींडरची मागणी किती, उपलब्ध साठा, वाटप आणि शिल्लक सिलिंडर या बाबी नियमितपणे रजिस्टरमध्ये नोंद करता का, दुकानात आणि गोदाममध्ये किती सिलिंडर ठेवता, ग्राहकांना घरपोच वाटप होते का, आदी बाबींची माहिती जाणून घेऊन प्रत्यक्ष रजिस्टर सुद्धा तपासले.
रजिस्टरमध्ये दैनंदिन भरलेली माहिती आणि गोदाममध्ये असलेल्या, भरलेले आणि रिकामे सिलिंडरच्या संख्येत तफावत तर नाही ना, याकरीता त्यांनी चेतक गॅस एजन्सीचे भटाळी येथील गोदामला भेट दिली. तसेच व्यवस्थापकाकडून माहिती जाणून घेऊन सिलिंडरच्या स्टॉकचे रजिस्टरसुध्दा तपासले. एवढेच नाही तर भरलेले आणि रिकामे सिलिंडर आपल्यासमोर मोजण्यास सांगितले. दैनंदिन रजिस्टर मधील नोंदी आणि प्रत्यक्षात सिलिंडरची संख्या याची पडताळणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव