नांदेडमधील गुन्हेगारीचे संपूर्ण उच्चाटन करा : खा. डॉ. गोपछडे
नांदेड, 09 एप्रिल (हिं.स.)। नांदेड शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था प्रचंडबिघडली आहे. अवघ्या 70 तासांत पाच जणांचे खून करण्यात आले आहेत. अवैध धंदे प्रचंड फोफावले आहेत. बलात्कार, घरपोडी, लुटमार सारख्या घटनांनी नांदेडकर त्रस्त झाले आहेत. अशा परिस्
Q


नांदेड, 09 एप्रिल (हिं.स.)। नांदेड शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था प्रचंडबिघडली आहे. अवघ्या 70 तासांत पाच जणांचे खून करण्यात आले आहेत. अवैध धंदे प्रचंड फोफावले आहेत. बलात्कार, घरपोडी, लुटमार सारख्या घटनांनी नांदेडकर त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नांदेड शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर उपाययोजना करा. नांदेडकरांना सुरक्षा पुरवा, सीसीटीव्ही कॅमेरा सुसज्ज सिटी सर्विलंस यंत्रणा संपूर्ण शहरात बसविणे, नांदेड शहरातील स्नेह नगर येथील जीर्ण झालेली कर्मचारी निवासस्थाने नव्याने उभारणे, नांदेड शहरातील पोलीस मुख्यालय येथील जीर्ण झालेल्या इमारतींचे बांधकाम करणे, वजीराबाद येथील वाहतूक गुन्हे शाखेचे कार्यालय अद्यावत करणे, तथा नांदेड जिल्ह्यातील पोलीस वसाहतीत नवीन निवासी संकुलांचे बांधकाम करणे तसेच नांदेड जिल्ह्यातील जीर्ण झालेल्या पोलीस स्टेशनच्या इमारती सुद्धा नव्याने निर्माण करणे अशा विविध मागण्या खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे केल्या आहेत. खा. डॉ. गोपछडे यांनी दाते यांची पोलीस महासंचालक कार्यालयात जाऊन भेट घेतली. मागण्यांचे निवेदन सादर केले.

नांदेड शहरात तब्बल पाच हत्या झाल्या आहेत. यामुळे नांदेडकर प्रचंड भयभीत झाले आहेत. एका पाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न प्रचंड निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत भयभीत झालेल्या नांदेडकरांना सुरक्षेचे वातावरण पुन्हा निर्माण करून देण्याची जबाबदारी पोलीस दलाची असतानाही नांदेड पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. नांदेड जिल्ह्यात वाळू माफीयांचे स्तोम माजले आहे. अवैध गुटखा प्रत्येक गल्ली बोळात मिळतो आहे. गुटखा माफियांची दादागिरी प्रचंड वाढली आहे. वेश्याव्यवसाय जोमात सुरू आहे. रस्त्यावर वाटमारी केली जात आहे. व्यापाऱ्यांचे लाखो रुपये पळवले जात आहेत. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतली जात आहेत. या सर्व घटनांमुळे नांदेड जिल्हा अत्यंत संवेदनशील होत चालला आहे. विशेषतः गुन्हेगारी जगतात असलेल्या गँगस्टारकडून अल्पवयीन मुलांना ओढले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्याचे भविष्य धोक्यात येते आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नांदेड जिल्ह्यात पुन्हा कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, गुन्हेगारीला आळा बसावा, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे मुळासकट उच्चाटन करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असा विश्वास राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी खा. डॉ. गोपछडे यांना दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande