
ठाणे, 09 एप्रिल, (हिं.स.)। तालुका स्तरांवरील गुणनियंत्रण निरीक्षक यांच्यामार्फत सर्व कृषि निविष्ठा विक्रेत्यांच्या वर्षभरात तीनदा तपासण्या करण्यात येऊन खताचे २५२, बियाण्यांचे ४२० व किटकनाशकाचे ८० नमुने काढुन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. पैकीबियाण्यांचा एक, खताचे १९ व किटकनाशकांचे १५ नमुने अप्रमाणित आढळुन आलेले होते. पैकी बियाण्यांच्या एका कंपनीवर कोर्टकेस दाखल करण्यात आली असुन खतांच्या दोन कंपन्यांवर पोलिस केस दाखल करण्यात आल्या आहेत तसेच एकुण ३०५ मे.टन खताच्या साठ्याची जप्ती करण्यात आली आहे.
किटकनाशकांची विनापरवाना विक्री करणाऱ्या तीन कंपन्यांवर पोलिस केस दाखल करण्यात आली आहे. तसेच बियाणे, खते व किटकनाशकांच्या एकुण ५२ उत्पादनांना विक्री बंद आदेश देण्यात आलेले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या एकुण ६ विक्री केद्रांचे परवाने रदद करण्यात आले असुन ७ परवाने निलंबित करण्यात आलेले असुन एका परवाना प्रकरणी सक्त ताकीद देण्यात आली आहे. वरील प्रमाणे कृषि विभागाच्या गुणनियंत्रण शाखेमार्फत केलेल्या कारवायांमुळे सन २०२५ मध्ये जिल्हयाभरात कोठेही खतांचा तुटवडा अथवा लिकिंग आढळुन आली नसल्याने शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा पुरवठा करण्यात कृषि विभाग यशस्वी ठरला आहे. कृषि विभागाच्या जनजागृती मोहिम आणि कठोर कारवायांमुळे खतांच्या वापरामध्ये १४ टक्के ची बचत करण्यात कृषि विभागाला यश आले आहे.
खरीप हंगाम सन २०२५ मधील अतिउच्च मागणी कालावधी (जुन ते ऑगस्ट) मध्ये युरीयाचा तुटवडा भासु नये यासाठी जिल्हयात १६ ठिकाणी नोडल एजन्सी मार्फत ६५० मे.टन युरीया खत साठा खरीप हंगामापुर्वीच संरक्षित करण्यात आला होता. तसेच प्रत्येक कृषि सेवाकेंद्रा वर दरदिवशी अनुदानित खतांचा किती साठा उपलब्ध आहे हे कृषिक - अॅप तसेच जिल्हास्तरीय ब्लॉग निर्माण करुन पाहण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. टिप- शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते कि, बियाणे, खते व किटकनाशकांची ज्यादा दराने अथवा अनुदानित खतांसोबत इतर उत्पांदनांची लिंकींग करुन विक्री करत असल्याचे आढळुन आल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षातील ९१८५२०४००६ किंवा ९३०९१२४०१० या व्हॉटसॅप क्रमांकावर संपर्क साधावा अथवा तालुका स्तरीय गुणनियंत्रण निरीक्षकांकडे पुराव्यासह तक्रार करण्यात यावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर