
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.) : जिल्हा व गाव पातळीवर विकासकामांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी केले. राज्यातील प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्यासाठी “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे अभियान राबविण्यात येत असून, ते यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
एमआयटी कॉलेजच्या मंथन सभागृहात विभागातील १३ जिल्ह्यांतील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट होते.
यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, रमेश बोरनारे, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मंत्री आबीटकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाने या अभियानाला मंजुरी दिली असून, प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात विकासाबरोबरच आरोग्याची जबाबदारीही पार पाडावी. जिल्हा, तालुका व गाव पातळीवर समित्यांची स्थापना करून संबंधितांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कॅन्सर, बीपी, मधुमेह यांसारख्या आजारांचे लवकर निदान व्हावे यासाठी आशा सेविका व आरोग्य अधिकारी यांनी घरोघरी पोहोचणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. “कोणीही आजारी पडू नये, यासाठी संत तुकडोजी महाराज यांनी सांगितलेल्या तत्त्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
हे अभियान केवळ शासकीय न राहता लोकसहभागातून यशस्वी करणे गरजेचे असल्याचे सांगत, प्रत्येक नागरिकाने शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावेत यासाठी सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोना काळात सरकारी आरोग्य व्यवस्थेने दिलेल्या आधारापेक्षा अधिक उत्कृष्ट काम या अभियानातून घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांनुसार आरोग्य विभागात लवकरच पदभरती करण्यात येणार असून, नवीन रुग्णालयांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री आबीटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis