
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल, (हिं.स.)।मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणातील रूग्ण छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी येतात. त्याप्रमाणात मोठ्या रूग्णालयांचे विशेषत: महिला व शिशू रुग्णालयाची इमारती उभ्या राहिल्या परंतू काही कारणास्तव रूग्णालये अजून सुरू झाले नसल्याने रूग्णालये लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली.
आमदार डॉ. लहामटे 'माझं गाव,आरोग्य संपन्न गाव' अभियान राबवित असल्याबाबत शासनाचे आभार मानले. प्रत्येक नागरिकांनी आरोग्य संपन्न होण्यासाठी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, आपले गाव आरोग्य संपन्न होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार बोरनारे यांनी ग्रामीण भागात कॅन्सर रूग्णांच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त त्यावर उपाय योजना करण्याच्या सुचना केली. त्याच बरोबर शासकीय रूग्णालयात चांगले उपचार केले जातात त्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांनी शासकीय रूग्णालयात उपचार घ्यावे, असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी ग्रामीण भागातील आरोग्य विषयक विविधबाबीची माहिती देत आरोग्य विभागात आवश्यक बाबीची उपलब्धता करून देण्याबाबत विविध सुचना केल्या.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी म्हणाले, चांगल्या आरोग्याची सुरवात शुध्द पाण्यापासून सुरू होते. त्यामुळे गावांतील स्वच्छ पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी 'माझं गाव,आरोग्य संपन्न गाव' अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्राणांचे सहयोग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. विनायक निपुण यांनी 'माझं गाव,आरोग्य संपन्न गाव' अभियानाविषयी माहिती देत म्हणाले की, आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नव्हे तर सार्वजनिक बाब आहे, त्यामुळे लोकसभागातून गाव आरोग्य संपन्न बनवायचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून माता-बाल स्वाथ्य सुधारणे, साथ रोगाला टाळणे ते रोखण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे आणि बीपी, शुगर व इतर आजाराचे वाढणारे प्रमाण वेळीच रोखण्यासाठी उपाय योजना करणे हे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी सर्वांनी समन्वयाने घरोघरी जाऊन तपासणी करून आपले गाव आरोग्य संपन्न गाव करायचे आहे. त्यासोबतच येत्या काळात हे अभियान शहरी भागात राबविण्यात येईल, असेही डॉ. विनायक म्हणाले.
या कार्यशाळेला छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक परिमंडळातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या 13 जिल्ह्यातील उपसंचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी ,जिल्हा आरोग्य शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. तसेच “माझं गांव, आरोग्य संपन्न गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis