रत्नागिरी : नैसर्गिक शेती कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी, 9 एप्रिल (हिं. स.) : कोकणातील शेती रासायनिक खतांच्या विळख्यातून मुक्त करून ती अधिक शाश्वत बनवण्यासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोकण विभागीय नैसर्गिक शेती कार्यशाळेला शेतकऱ्या
रत्नागिरी : नैसर्गिक शेती कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


रत्नागिरी, 9 एप्रिल (हिं. स.) : कोकणातील शेती रासायनिक खतांच्या विळख्यातून मुक्त करून ती अधिक शाश्वत बनवण्यासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोकण विभागीय नैसर्गिक शेती कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेला कोकण विभागातून 1 हजार 250 हून अधिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी नैसर्गिक शेतीचे विविध तंत्र समजून घेतले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ‘नैसर्गिक शेती’ या विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तांत्रिक सत्रात अहमदाबाद येथील बन्सी गीर गो-शाळेचे गोपाळभाई सुतारिया यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व आणि त्यातील बारकावे सविस्तर स्पष्ट केले.

विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल माळी आणि डॉ. अशोककुमार चव्हाण यांनी कोकणातील प्रमुख पिके जसे आंबा, काजू, मसाले पिके, भात आणि नाचणी यामध्ये नैसर्गिक शेतीचा प्रभावी अवलंब कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.

याशिवाय सुनील चोत्कर (संचालक, पुणे) यांनी नैसर्गिक शेतीविषयक शासकीय धोरणे स्पष्ट केली, तर विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांनी कार्यशाळेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे मांडली. कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ यांनी शेतीतील भविष्यातील संधी आणि आव्हानांवर प्रकाश टाकला.

दुपारच्या सत्रात कौस्तुभ देशपांडे यांनी गो-आधारित शेतीची उपयुक्तता सांगितली, तर प्रशांत नाईकवाडी यांनी नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण कसे करावे याविषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यशाळेदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले तसेच शंका विचारल्या. तज्ज्ञांनी त्यांचे समाधानकारक निरसन केले. रासायनिक शेतीला प्रभावी पर्याय म्हणून नैसर्गिक शेती ही भविष्यातील गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande