
कोल्हापूर, 16 मे (हिं.स.) : आगामी 31 मे रोजीच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील गांधीनगर परिसरात तंबाखूविरोधी विशेष धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. ही संयुक्त मोहीम राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP), सीपीआर रुग्णालय कोल्हापूर, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाने पार पडली.
जिल्हा शल्य चिकित्सक (प्र.) डॉ. सरिता थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. रेश्मा पाटील, वसाहत रुग्णालय गांधीनगरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
पथकाने गांधीनगर परिसरातील वसाहत रुग्णालय, पोलीस स्टेशन परिसर, शाळा परिसर, बाजारपेठ तसेच पानटपऱ्यांची तपासणी केली. दरम्यान Cigarettes and Other Tobacco Products Act (COTPA) 2003 अंतर्गत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 27 जणांवर दंडात्मक कारवाई करत सुमारे 5,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कारवाईदरम्यान नागरिक, विक्रेते आणि तरुणांना तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आरोग्य दुष्परिणाम, कर्करोगासारखे जीवघेणे आजार तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.
तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता ही चिंतेची बाब असून आगामी काळात अशा संयुक्त मोहिमा अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात राबविण्यात येतील, असे डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी सांगितले.
या मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी आर. पी. पाटील, डॉ. तेजस्वी पवार, श्रीमती चारुशीला कणसे, क्रांती शिंदे, मंगल चव्हाण, क्लरा चोपडे तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याचे पी. एन. खाडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar