
कोल्हापूर, 20 मे (हिं.स.)। औषधांची ऑनलाईन आणि ॲपच्या माध्यमातून होणारी विक्री बंद करा, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यासाठी देशभरातील केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनानी आज (दि.20) या मागण्यांसाठी देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच हजार केमिस्ट या संपात सहभागी झाले. विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर भव्य मोर्चा काढत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना दिलं. दरम्यान, आजच्या बंदमुळं जिल्ह्यातील 45 कोटींची उलाढाल ठप्प झाली असून मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास बेमुदत बंद करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी दिला.
बेकायदेशीर ऑनलाईन फार्मसी विरोधात अखिल भारतीय केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनेकडून आज देशव्यापी बंद करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून अधिकृत डॉक्टरांच्याशिवाय कोणत्याही औषधाची चिट्टी नसतानाही औषधांचा पुरवठा केला जात आहे. यातून देशभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये बेकायदेशीर औषधांचा साठा आढळून आला. यामुळे औषधांची ऑनलाईन विक्री बंद व्हावी, यासाठी देशभरातील संघटनांनी आंदोलन पुकारलं आणि आज सर्व दुकाने बंद ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे साडेपाच हजार केमिस्ट या आंदोलनात सहभागी झाले. देशव्यापी बंद पुकारण्यात आल्यानंतर मागण्यांचा केंद्र आणि राज्य सरकारने विचार न केल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar