
रायगड, 16 मे (हिं.स.)। ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक व आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी व्हिआय कंपनीविरोधात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, रायगड-अलिबाग येथे ३२ लाख रुपयांचा दावा दाखल केला आहे. अलिबाग येथील ॲड. अजय उपाध्ये यांच्या माध्यमातून हा दावा ११ मे २०२६ रोजी दाखल करण्यात आला.
प्रा. डॉ. जयपाल पाटील हे अलिबागचे रहिवासी असून गेली चार दशके पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये संपादक, उपसंपादक व वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातही त्यांनी देशभरात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांना महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
तक्रारीनुसार, डॉ. पाटील हे त्यांच्या सेवाभावी व सामाजिक कार्यासाठी वोडाफोन कंपनीचा ९६७३७२७२७७ हा मोबाईल क्रमांक वापरत होते. महाराष्ट्र पोलीस, डॉक्टर, वकील, ग्रामसेवक, सरपंच, रुग्णवाहिका चालक तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचा संपर्क या क्रमांकाद्वारे कायम होता.
१४ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून ४८९.३० रुपयांचे रिचार्ज केले होते. खात्यात शिल्लक असूनही कंपनीने सेवा बंद केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. मोबाईल सेवा अचानक बंद झाल्याने संपर्क तुटला आणि आपत्ती व्यवस्थापनासह विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये अडचणी निर्माण झाल्या. यामुळे पंधरा ते वीस कार्यक्रमांना उपस्थित राहता आले नाही तसेच मानसिक, आर्थिक व सामाजिक नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी कंपनीला पूर्वी नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, योग्य सेवा न मिळाल्याने ग्राहक मंचात दावा दाखल करण्यात आला. मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रासापोटी ३२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दावा दाखल करण्यासाठी लागलेली २५ हजार रुपयांची फीही कंपनीकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी ॲड. अजय उपाध्ये यांनी केली आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ मे २०२६ रोजी होणार असून या प्रकरणाकडे रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)