
रत्नागिरी, 16 मे (हिं.स.) । छातीत दुखत असल्याने पत्नीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले असता महिला कर्मचारी उपलब्ध असूनही पुरुष टेक्निशियनकडून ईसीजी करण्यास सांगितल्याचा आरोप करत राजापूर येथील रहिवासी श्री. उदय उल्हास खडपे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
राजापूरच्या खडपेवाडीतील रहिवासी उदय खडपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्नी सौ. संगीता उदय खडपे यांना छातीत दुखत असल्याने राजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रुग्णालयात ईसीजी करण्यास सांगण्यात आले. संबंधित वेळी महिला डॉक्टर श्वेता कशेळीकर व पुरुष डॉक्टर आर्यन उपस्थित होते. महिला डॉक्टर उपलब्ध असूनदेखील पुरुष टेक्निशियनकडून ईसीजी करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
संबंधित डॉक्टरांनी उद्धट व उद्दाम वर्तन केल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. या प्रकारामुळे नाइलाजास्तव पत्नीला खासगी दवाखान्यात नेऊन ईसीजी करावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शहरातील नागरिकांबाबत अशी परिस्थिती असेल तर ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची अवस्था अधिक गंभीर असू शकते, अशी खंत व्यक्त करत संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री. खडपे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी