उर्जा राज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच तासनतास लोडशेडींग..! रखरखत्या उन्हाने हैराण
परभणी, 16 मे (हिं.स.)। गेल्या महिनाभरापासून परभणी महानगरासह संपूर्ण जिल्हा रखरखत्या उन्हाने, उसळलेल्या उष्णतेच्या लाटेने अक्षरशः होरपळून निघाला असतांना सुध्दा वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी सामान्य नागरीकांना या अडी अडचणीच्या काळात सुरळीतपणे वीज
उर्जा राज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच तासनतास लोडशेडींग..! रखरखत्या उन्हाने हैराण


परभणी, 16 मे (हिं.स.)।

गेल्या महिनाभरापासून परभणी महानगरासह संपूर्ण जिल्हा रखरखत्या उन्हाने, उसळलेल्या उष्णतेच्या लाटेने अक्षरशः होरपळून निघाला असतांना सुध्दा वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी सामान्य नागरीकांना या अडी अडचणीच्या काळात सुरळीतपणे वीज पुरवठा करण्याऐवजी दररोज मोठ्या प्रमाणावर अघोषित असे लोडशेडींग सुरु केले आहे. जानेवारी महिन्यापासून शहरासह जिल्ह्यातील हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल सुरु झाला. विशेषतः फेबु्रवारीच्या मध्यंतरात हवामानात हळूहळू उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली. फेबु्रवारी अखेर तर हवेतील या उष्णतेने मोठ्या प्रमाणावर उकाडा वाढला. मार्च महिन्यात तर मोठ्या प्रमाणावर उन्हाची तीव्रता वाढल्याने वातावरण तर गरमा गरम झालेच परंतु, या उष्णतेने सर्वसामान्य नागरीक अक्षरशः हैराण झाले. अख्खा एप्रिल महिन्यातील उन्हाच्या तीव्रतेने तसेच मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यातील उष्णतेच्या लाटेने हे सर्वसामान्य नागरीक अक्षरशः होरपळून निघाले. त्यामुळे या नागरीकांना दिलासा देण्याऐवजी वीज वितरण कंपनीने तासनतास लोडशेडींग करीत कहर सुरु केला. त्यामुळे सामान्य नागरीक कमालीचे संतापले. शहरी भागात मध्यवस्तीसह चोहोबाजूंनी सातत्याने वीज पुरवठा खंडीत करण्याचे, तासनतास वीज गायब करण्याचे व अघोषित अशी लोडशेडींग करण्याचे हे प्रकार नागरीकांना अंगवळणीचे ठरले. तर ग्रामीण भागातसुध्दा दिवसाबरोबर रात्रीसुध्दा लोडशेडींग करीत वीज वितरण कंपनीने कहरच केला. दरम्यान, उर्जा राज्य मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याकडे वीज वितरण कंपनीच्या या अंदाधुंद कारभाराबद्दल अनेक गंभीर स्वरुपाच्या तक्रारी गेल्या आहेत. परंतु, या तक्रारींबद्दल कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत, हे जिल्हावासीयांचे दुर्देव आहे. पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी या पार्श्वभूमीवर ही अघोषित लोडशेडींग तात्काळ थांबवावी, अशी अपेक्षा केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande