
परभणी, 16 मे (हिं.स.)।
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या “ज्ञानभारतम” या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखीत सर्वेक्षण मोहिमेस १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. “हर घर दस्तक” संकल्पनेनुसार राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेद्वारे देशभरातील मौल्यवान हस्तलिखीतांचा शोध, नोंदणी, संवर्धन व डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.भारतीय पारंपारिक ज्ञान पिढ्यान्पिढ्या हस्तलिखीतांच्या माध्यमातून जतन झालेले असून ही हस्तलिखीते विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात उपलब्ध आहेत. हे मौल्यवान ज्ञानभांडार एकत्र करून राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने “ज्ञानभारतम” प्रकल्पाची आखणी केली आहे.केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये घोषित करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्रहालयांच्या माध्यमातून एक कोटीहून अधिक हस्तलिखीतांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखीतांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे.सदर हस्तलिखीतांची मालकी संबंधित संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्रहालय यांच्याकडेच राहणार असून इच्छुकांनी स्वखुशीने हस्तलिखीते शासनाकडे सुपूर्द केल्यास शासन ती स्वीकारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य नोडल अधिकारी म्हणून मुजितकुमार उगले कार्य पाहणार आहेत. तसेच श्रीमती अंजली इमाळ, उपसंचालक, मराठी भाषा विकास संस्था तथा अभिजात मराठी भाषा कक्ष, मराठी भाषा विभाग या महा-नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.या सर्वेक्षणासाठी “Gyan Bharatam” हे मोबाईल अँप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखीतांचे क्षेत्रीय मूल्यमापन, पडताळणी व हस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था तसेच खाजगी संग्रहालयांनी या सर्वेक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन तहसीलदार, परभणी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis