
लातूर, 16 मे (हिं.स.) : संत परंपरेने महाराष्ट्राला अध्यात्म, संस्कार आणि मानवतेचा संदेश दिला आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी हे समाजाला योग्य दिशा देणारे अमूल्य आध्यात्मिक ज्ञान आहे. अखंड हरिनाम सप्ताह आणि पारायण सोहळ्यामुळे समाजात भक्ती, एकोपा आणि सद्भावना वाढीस लागते. तरुण पिढीने संत साहित्याचा अभ्यास करून आपल्या जीवनात चांगले संस्कार रुजवावेत असे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर तालुक्यातील मौजे रावणगाव येथे हनुमान मंदिर परिसरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना ते संबोधित करत होते.
यावेळी माजी उपसभापती रामराव बिरादार, लातूर जि.प.चे बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, जि.प. सदस्य दिलीपकुमार मटके, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले पाटील, उपसभापती बापुसाहेब भोसले, पं.स. सदस्य प्रकाश बिरादार, रावणगावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी गावातील नागरिक, वारकरी संप्रदायाचे भक्त, भजनी मंडळाचे सदस्य तसेच पंचक्रोशीतील भाविक - भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्यानिमित्त हरिनामाच्या गजराने व भक्तीमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला होता. विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन व प्रवचनाच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक संदेश देण्यात आला. यावेळी माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी मंदिरात दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व आयोजकांचे कौतुक केले.या प्रसंगी ग्रामस्थ, वारकरी संप्रदायाचे मान्यवर, मंदिर समिती सदस्य, कार्यकर्ते आणि महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis