
सिन्नर, 16 मे (हिं.स.)।
- यवतमाळ येथून रोजगारासाठी आलेल्या परिवारातील महिला आणि तीन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे
तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील नागरे बंधाऱ्यात शनिवारी (दि.16) दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका महिलेसह तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मनिषा विजय रामजोशी (30), कार्तिक विजय रामजोशी (9), आदित्य राहुल शिंदे (7), अविनाश राहुल शिंदे (8) असे मृत महिला व चिमुकल्यांचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील वडारपुरा येथील विजय रामजोशी (33) व त्यांचे मेव्हणे राहुल रामदास शिंदे हे त्यांची पत्नी व मुलांसह मोलमजुरीसाठी तीन दिवसांपूर्वी नांदूरशिंगोटे परिसरात आले होते. नाशिक–पुणे महामार्गालगतच्या मोकळ्या जागेत त्यांनी तात्पुरता पाल ठोकून मुक्काम केला होता. त्यांच्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर नागरे बंधारा आहे.
दुपारी साडेचारच्या सुमारास संबंधित मनिषा, तिचा मुलगा कार्तिक व आदित्य व अविनाश हे चौघे बंधाऱ्याकडे गेले होते. त्यावेळी एक मुलगा पाण्यात पडल्याने त्याला वाचवण्यासाठी मनिषा व इतर दोन्ही मुले पाण्यात उतरली. मात्र, बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असल्याने चौघांनाही बाहेर येता आले नाही आणि दुर्दैवाने चौघांचाही बुडून मृत्यू झाला.
सायंकाळी पाचच्या सुमारास महिलेचा पती कामावरून परतल्यानंतर पत्नी व मुले दिसून न आल्याने त्याने परिसरात शोधाशोध सुरू केली. बंधाऱ्याजवळ कपडे व चपला आढळून आल्याने संशय बळावला. यावेळी विजय यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांचा मेव्हणा राहुलही येथे आला. दोघांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यात उतरून मनिषा व मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी पाण्याच्या तळाला मनीषा व मुलांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
विजय यांनी रुग्णवाहिकेद्वारे पत्नी मनीषा व मुलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी चौघांनाही तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे नांदूरशिंगोटे परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV