
बीड, 17 मे (हिं.स.)। ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने परळी आणि परिसरात एक ऐतिहासिक लोकचळवळ उभी राहणार आहे. ५,००० हून अधिक स्वयंसेवक, १५० गावे, शाळा, महाविद्यालये, शेतकरी गट, युवक संघटना, सामाजिक संस्था आणि समाजातील विविध घटक एका महान ध्येयासाठी एकत्र येणार आहेत फक्त एका आठवड्यात २५ लाख फळझाडांची लागवड केली जाणार आहे.
ही चळवळ ग्रामीण दारिर्धाविरुद्ध लढण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, नद्या आणि भूजल पुनर्जीवित करण्यासाठी, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, हरित रोजगार निर्माण करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणीय संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी उभारली जात आहे. या मोहिमेअंतर्गत जवळपास १५० गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी सर्वाधिक वृक्षलागवड आणि त्यांचे एक वर्ष संगोपन करण्यासाठी मोठी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
वृक्षलागवड ही केवळ एकदिवसीय मोहीम न राहता, दीर्घकालीन पर्यावरणीय जबाबदारी म्हणून रुजवण्याचा हा प्रयत्न असेल. या परिवर्तनात्मक उपक्रमाला अधिक बळ देताना जीव्हीटीने परिसरातील १०८ किलोमीटर नदीपात्रांचे खोलीकरण आणि रुंदीकरण पूर्ण केले आहे. आता या नद्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून संपूर्ण नदीपट्टा हरित पट्ट्यात रूपांतरित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे जलसुरक्षा, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरणीय संतुलन यांना दीर्घकालीन लाभ मिळणार आहेत. विशेष म्हणजे, ५ जून २०२७ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या संपूर्ण मोहिमेचा प्रभाव अहवाल आणि ऑडिट सार्वजनिक करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis