
बीड, 17 मे (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे संरक्षण आणि कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ अंतर्गत राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहाराचे नियमन करण्यात येते. परंतु तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी, संस्था तसेच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंदर्भात परिपत्रक जाहिर केले असून संबंधितांना वेळोवेळी सुचना देवुनही काही व्यापारी व संस्था विनापरवाना व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता कायद्यानुसार आवश्यक परवाना घेतल्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis