
पुणे, 17 मे (हिं.स.)।
एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या ताफ्यात १० नव्या ‘जिजाऊ’ बस दाखल झाल्या असून, त्यामुळे बारामती आणि नीरा परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. परिवहनमंत्री यांनी केलेल्या घोषणेनुसार या बस पुणे मुख्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांचे तातडीने वाटप करण्यात आले.
ताफ्यात समाविष्ट झालेल्या १० बसपैकी बारामती डेपो आणि बारामती एमआयडीसी डेपोला प्रत्येकी पाच बस देण्यात आल्या आहेत. बारामती डेपोला मिळालेल्या बस ‘बारामती-नीरा’ मार्गावर धावणार आहेत, तर बारामती एमआयडीसी डेपोच्या बस स्वारगेट-बारामती एमआयडीसी या मार्गावर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.दोन महिन्यांपूर्वी पुणे मुख्यालयात ‘जिजाऊ’ मालिकेतील एक बस दाखल झाली होती. ही बस सध्या स्वारगेट-बारामती मार्गावर यशस्वीपणे धावत असून प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता आणखी १० नव्या बसची भर पडल्याने पुणे विभागाचा ताफा अधिक सक्षम झाला आहे.
या नव्या बसमुळे ग्रामीण आणि उपनगरी भागातील प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु