राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : कोल्हापूर, पुणे, नाशिक, लातूर अंतिम फेरीत
बदलापूर, 17 मे (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यजमान मुंबईसह नागपूर विभागने दोन गटात अंतिम फेरीत धडक मारली असून कोल्‍हापूर,
बदलापूर


बदलापूर, 17 मे (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यजमान मुंबईसह नागपूर विभागने दोन गटात अंतिम फेरीत धडक मारली असून कोल्‍हापूर, पुणे, नाशिक, लातूर विभागही विजेतेपदासाठी सज्‍ज झाले आहेत.

बदलापूर जिमखाना मैदानावर सुरू असलेल्‍या राज्य व्हॉलीबॉल स्‍पर्धेचा चौथा दिवस यजमान मुंबई व नागपूर विभागाने गाजविला. २१ वर्षांखालील दोन्‍ही गटात मुंबईने तर १८ वर्षांखालील दोन्‍ही गटात नागपूरने अंतिम फेरीत मुसंडी मारत दुहेरी विजेतेपदाकडे वाटचाल कायम राखली आहे. स्‍पर्धेच्‍या प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढत असून चौथ्या दिवशी आमदार किसन कथोरे यांनी स्‍पर्धेला भेट दिली. माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, नगरसेवक किरण भोईर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, विश्वकरंडक खोखो विजेती रेश्मा राठोड आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

विदयुत प्रकाशझोतात रंगलेल्‍या स्‍पर्धेत २१ वर्षांखालील मुलांच्‍या गटातील उपांत्‍य लढत मुंबई विरूध्द कोल्हापूर संघाची उपांत्‍य लढत चौथ्या सेटपर्यंत रंगली. 25- 14,25- 20,15- 25,27- 25 गुणांनी मुंबईने आपले वर्चस्‍व प्रस्‍थापित करीत अंतिम फेरीकडे कूच केली. जीवक वाघमारेने आक्रमण, रूद्र वरूणच्‍या अष्टपैलू खेळाच्‍या जोरावा मुंबईने चौथा सेट जिंकत मैदान गाजवले.

२१ वर्षांखालील मुलीच्‍या गटातील नाशिक विरूध्द पुणे लढत शेवटच्‍या मिनिटापर्यंत अटीतटीची झाली. पहिले दोन सेटमध्ये नाशिक विभाग 17- 25,13- 25गुणांनी मागे होता. कच न खाता तुफानी खेळ करीत 25- 14,25- 16,16- 14 गुणांनी ३ सेट जिंकत नाशिक लक्षवेधी कामगिरी करीत प्रेक्षकांची मने जिंकली. गतविजेत्‍या नाशिककडून हिमांशी ओतारी, साक्षी गुलदगड व स्वरा देवघरेने वेगवान खेळ करीत अंतिम फेरीत मजल मारली आहे. अंतिम फेरीत नाशिकची झुंज तुल्‍यबळ मुंबई संघा विरूध्द होईल.

मुलांच्‍या १८ वर्षांखालील गटात कोल्हापूरने लातूरचा 25- 20,25- 13,25- 18 गुणांनी तर नागपुरने पुणे विभागाचा 25- 13, 25- 22, 30- 32, 25- 15 पराभव करीत अंतिम फेरी गाठली. नागपूरच्‍या वत्‍सल्‍य किरटकर, कृष्णा तडसे व कर्मण्य चिलकुलवारने झटपट गुण वसूल करीत चौथ्या सेटमध्ये सामना जिंकत अंतिम फेरीचे व्‍दार संघासाठी खुले केले. मुलींच्‍या गटात पुणे विभागने गतविजेत्‍या लातूरचा 25- 23,25- 20,25- 23 सरळ सेटमध्ये पराभव केला. कार्तिकी गरगडे, तन्वी साळंके व समृध्दी चांदगडेच्‍या खेळामुळे पुणे संघाचे शेवटपर्यंत झुंज देत मैदान मारले. आता पुणे संघाची अंतिम फेरीत नागपुर विरूध्द आमनासामना रंगणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते होणार आहे. पाच दिवस चाललेल्‍या या स्‍पर्धेत राज्‍यतील ८ विभागातील ३८४ खेळाडूंचा थरार रंगला. स्‍पर्धेतील विजेत्‍यांना २३ लाख ३५ हजारांची रोख बक्षिसे व करंडक, पदके देणार येणार आहे

अंतिम लढती पुढीलप्रमाणे

२१ वर्षांखालील मुले - लातूर विरुद्ध मुंबई

२१ वर्षांखालील मुली - नाशिक विरुद्ध मुंबई

१८ वर्षांखालील मुले - कोल्हापूर विरुद्ध नागपुर

१८ वर्षांखालील मुली - पुणे विरुद्ध नागपूर

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande