बीसीसीआयकडून २०२६-२७ देशांतर्गत हंगामाचे वेळापत्रक जाहीर
नवी दिल्ली, 20 मे (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२६ हंगामासोबतच देशांतर्गत क्रिकेट हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आगामी २०२६-२७ हंगामात पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये एकूण १,७८८ सामने आयोजित करण्याची मंडळाची योजना आहे.
बीसीसीआय


नवी दिल्ली, 20 मे (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२६ हंगामासोबतच देशांतर्गत क्रिकेट हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आगामी २०२६-२७ हंगामात पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये एकूण १,७८८ सामने आयोजित करण्याची मंडळाची योजना आहे. या हंगामात पुरुष क्रिकेटमध्ये वरिष्ठ, २३ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील गटांतील स्पर्धांचा समावेश असेल. महिला क्रिकेटमधील वरिष्ठ, २३ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि १५ वर्षांखालील स्पर्धांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

२०२६-२७ देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात २३ ऑगस्ट रोजी दुलीप ट्रॉफीने होईल. दुलीप ट्रॉफीमध्ये सहा विभागांतील संघ सहभागी होतील. यामध्ये उत्तर विभाग, दक्षिण विभाग, पूर्व विभाग, पश्चिम विभाग, ईशान्य विभाग आणि मध्य विभाग यांचा समावेश आहे.

देशांतर्गत क्रिकेटला आधुनिक खेळाशी जुळवून घेण्याच्या बीसीसीआयच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, पुरुषांची अंडर-२३ स्टेट 'ए' ट्रॉफी आणि विजय ट्रॉफी या एकदिवसीय स्पर्धांचे स्वरूप बदलून टी-२० करण्यात आले आहे. विजय मर्चंट ट्रॉफी (अंडर-१६) च्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. ही स्पर्धा आता नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत खेळवली जाईल, ज्यामुळे क्रिकेटपटूंना अधिक चांगली तयारी करता येईल.

भारताच्या सर्वात प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा, रणजी ट्रॉफी आणि कर्नल सी.के. नायडू ट्रॉफी, पुन्हा एकदा दोन टप्प्यांत खेळवल्या जातील. यामुळे क्रिकेटपटूंना पुरेसा वेळ मिळेल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटला प्राधान्य दिले जाईल. रणजी ट्रॉफी एलिट ग्रुपमध्ये ३२ संघ असतील. त्याची चार गटांमध्ये विभागणी केली जाणार आहे. तर प्लेट ग्रुपमध्ये सहा संघ असतील. रणजी ट्रॉफीचा पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान खेळला जाईल. त्यानंतर दुसरा टप्पा १७ जानेवारी रोजी सुरू होईल. तर बाद फेरीचे सामने ९ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान होणार आहेत.रणजी ट्रॉफी व्यतिरिक्त, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी२० स्पर्धा १४ नोव्हेंबर रोजी सुरू होईल, ज्यातील बाद फेरीचे सामने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान होणार आहेत. विजय हजारे ट्रॉफी देखील १४ डिसेंबर रोजी सुरू होईल. आणि बाद फेरीचे सामने २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande