
रत्नागिरी, 17 मे (हिं.स.) । बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांद्वारे निर्माण केल्या जाणाऱ्या अव्यावसायिक स्पर्धेच्या निषेधार्थ अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने येत्या २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे.
रत्नागिरी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नंदू गोंधळी यांनी या संदर्भात माहिती दिली. या दिवशी जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते दुकाने बंद ठेवणार आहेत. तसेच केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व औषध विक्रेते काळ्या फिती लावून या धोरणाचा तीव्र निषेध नोंदवणार आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाइन औषध विक्रीला स्थगिती दिली असतानाही, सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने संघटना आक्रमक झाली आहे.
कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी केंद्र सरकारने दिलेली विशेष सूट पाच वर्षे उलटूनही अद्याप रद्द करण्यात आलेली नाही. याचाच गैरफायदा घेत ऑनलाइन आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या स्वतःचे अफाट भागभांडवल घालून २० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलती (डिस्काउंट) देत आहेत. यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या देशातील साडेबारा लाख औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. सरकारकडून होलसेलर आणि रिटेलरचा नफा नियंत्रित केला जात असताना, कॉर्पोरेट कंपन्या मात्र अव्यावसायिक स्पर्धा निर्माण करून छोट्या दुकानदारांना संपवत असल्याचा आरोप गोंधळी यांनी केला आहे.
सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद नसल्याने आंदोलनाचे पाऊल या अन्यायकारक धोरणाविरोधात आणि लहान व्यावसायिकांच्या हितासाठी संघटनेने केंद्रीय मंत्र्यांपासून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत वारंवार निवेदने देऊन दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर औषध विक्रेत्यांना देशव्यापी आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या मक्तेदारीला तोंड देण्यासाठी सरकारने औषध विक्रेत्यांना डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधांऐवजी त्याच दर्जाची इतर पर्यायी ब्रँडची औषधे देण्याचा अधिकार द्यावा, जेणेकरून किरकोळ औषध विक्रेते सक्षमपणे या स्पर्धेत टिकून राहू शकतील, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी