
पुणे, 17 मे (हिं.स.)।
बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्यातील दुष्काळी भागासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या जनाई-शिरसाई तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नावर आमदार राेहित पवार यांनी पुढाकार घेत पुण्यातील सिंचन भवन येथे जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीस दोन्ही तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत खडकवासला कालव्याची अपुरी वहन क्षमता, जनाई-शिरसाई योजनेसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता, बंद पाईपलाईन सुरू करणे, सौरऊर्जा प्रकल्प, तलावातील गाळ काढणे तसेच पाणीवापर संस्थांचे अद्ययावतीकरण आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी खडकवासला कालव्याची सध्याची १००० क्युसेक्स वहन क्षमता वाढवून ती १४०० क्युसेक्स करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जनाई योजनेसाठी ३०० एमसीएफटी आणि शिरसाई योजनेसाठी २०० एमसीएफटी असे एकूण ५०० एमसीएफटी पाणी उपलब्ध करून देण्याचेही निश्चित करण्यात आले.
या निर्णयामुळे बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु