नाशिक - जमीन भूसंपादनावरून प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
कुंभमेळा मंत्री महाजन यांच्या निवासस्थानी मोर्चाही काढणार नाशिक, 17 मे (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यामध्ये जमीन भूसंपादन करण्यावरून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्षाची ठिणगी वाढतच चालली असून शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये एक इंच ही जमीन न द
Farmers' protest against


कुंभमेळा मंत्री महाजन यांच्या निवासस्थानी मोर्चाही काढणार

नाशिक, 17 मे (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यामध्ये जमीन भूसंपादन करण्यावरून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्षाची ठिणगी वाढतच चालली असून शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये एक इंच ही जमीन न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून जमीन वाचविण्यासाठी वेगवेगळे आंदोलन प्रशासनाविरोधात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याची सुरुवात आज सोमवारी आत्मक्लेष आंदोलनापासून करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये सिंहस्थ कुभमेळा आणि शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी जमीन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेमुळे काही शेतकरी हे पूर्णपणे उध्वस्त झालेले आहेत तर काही शेतकऱ्यांचे जमीन मोठ्या प्रमाणावर केलमुळे ते अल्पभूधारक शेतकरी झाले आहेत. यामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष हा वाढतच चालला आहे रविवारी नाशिक जिल्ह्यातील विल्होळी येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती ज्या बैठकीला गौळाने, आंबेबहुला, राजूरबहुला, आडवण, त्र्यंबक परिसरातील बाधित शेतकरी तसेच पारदेवी, चिंचोली, पांढुरली, दरी, मातोरी, मुंगसारा, पालखेड, दिंडोरी, सिन्नर, अंबड, सातपूर आणि माडसांगवी आदी विविध गावांतील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक पार पडली. यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील निवासस्थानी नाशिक ते जळगाव अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाब विचारण्याचाही निर्णय घेण्यात आला. बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय अथवा रामकुंड-गंगा गोदावरी येथे सर्व बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला.

बैठकीत कुंभमेळा मंत्री महाजन यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “कुंभमेळा मंत्री” हे पद संविधानिक नसून, त्या पदाचा वापर करून प्रशासनावर दबाव टाकत जबरदस्तीने भूसंपादन करून बिल्डरधार्जिणे धोरण राबवले जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. तसेच जलसंपदा मंत्री म्हणून उत्तर महाराष्ट्र त्यांच्या अधिकारक्षेत्रात नसताना नाशिक जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप कोणत्या अधिकाराने करत आहेत, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यावरही शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले. यापूर्वीही चुकीच्या जमीन हस्तांतरण प्रक्रियेमध्ये त्यांची भूमिका राहिल्याचा आरोप करत, आता कुंभमेळ्याच्या नावाखाली रस्ते अधिग्रहणासाठीच त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शेतकरी म्हणाले. त्यामुळे नामदार गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तात्काळ नाशिक जिल्ह्याच्या कारभारातून हटवून नवीन जबाबदार पालकमंत्री व जिल्हाधिकारी नियुक्त करावेत, अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, मागण्या मान्य न झाल्यास शासनाविरोधात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे केले जाईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल. शेतकऱ्यांनी नव्याने करण्यात आलेल्या मोजणीला पूर्ण विरोध दर्शवत, “आमची एक इंचही जमीन आम्ही देणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला. तसेच मातोरी आणि मुंगसारा येथे शेतकरी व महिलांवर झालेल्या लाठीचार्जबाबत काय कारवाई झाली, याचा जाबही जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मुंगसारा येथे लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या ८० वर्षीय आजींच्या घरी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने तीन तासांचे आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याच आंदोलनादरम्यान पुढील तीव्र आंदोलनाची दिशा देखील जाहीर करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. बैठकीस छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शेतकरी नेते साहेबराव दातीर, ॲड. कैलास खांडबळे, कामगार नेते विक्रम नागरे, शिवसेना शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख हरिभाऊ बोडके, माजी पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक लोकप्रतिनिधींमधून पालकमंत्री द्यावा

यावेळी शेतकऱ्यांनी एकमुखाने ठराव करत स्पष्ट केले की, गिरीश महाजन यांनी चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप सुरूच ठेवला, तर त्यांच्या “कुंभमेळा मंत्री” या पदालाच न्यायालयात आव्हान दिले जाईल. बैठकीत नाशिक जिल्ह्याला तात्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींमधून पालकमंत्री द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. “नाशिकचा पालकमंत्री नाशिकचाच असावा, जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी योग्य दार उपलब्ध होईल,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सोमवारी ( दिनांक १८) सकाळी ११ वाजता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व बाधित शेतकरी एकत्र येणार असून, यापूर्वी करण्यात आलेल्या चुकीच्या मोजण्या तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात येणार आहे. डीपी व आरपी रोडच्या नियमानुसार नव्याने मोजणी करावी आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे त्यांना चालू बाजारभावाच्या पाचपट मोबदला द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande