
नांदेड, 17 मे (हिं.स.)।
उन्हाळी सुटी म्हणजे केवळ मोबाईल, टीव्ही आणि घरातला आळस नव्हे, तर शरीराला तंदुरुस्त आणि मनाला सक्षम बनवण्याची सुवर्णसंधी असते, हेच नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आयोजित 'स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२६'ने सिद्ध करून दाखवले. तब्बल पंधरा दिवस रंगलेल्या या उत्साही शिबिराचा समारोप जल्लोषात झाला.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. या शिबिराने बालकांच्या अंगातील ऊर्जा, जिद्द आणि क्रीडाप्रेमाला नवे व्यासपीठ मिळवून दिले.
मैदानावर धावणारी पावले, विजयासाठी झुंजणारी उमेद, घामातून घडणारी तंदुरुस्ती आणि खेळातून उमलणारा आत्मविश्वास अशा प्रेरणादायी वातावरणात विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण घेतले. अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, खो-खो, क्रिकेट, कबड्डी, बास्केटबॉल आणि हॉकीसारख्या मैदानी खेळांसोबतच जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, एरोबिक्स, बॉक्सिंग, योगा, वेटलिफ्टिंग आणि फिजिकल फिटनेसचेही दर्जेदार प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराचे खास आकर्षण म्हणजे सहभागी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची भव्य क्रीडांगणे आणि आधुनिक इनडोअर स्टेडियममध्ये सरावाची संधी मिळाली. राष्ट्रीय स्तरावरील अनुभवी प्रशिक्षक आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. सहभागींसाठी मोफत बस सेवा आणि आकर्षक टी-शर्टची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती.
५ ते १८ वर्षे वयोगटातील तब्बल ७० मुला-मुलींनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला. उन्हाळी सुटीचा विधायक उपयोग करत मुलांमध्ये शारीरिक क्षमता, शिस्त, टीम स्पिरिट आणि आत्मविश्वास विकसित झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis