माणगावात भीषण अपघात; एसटी बसमध्ये पाय अडकल्याने महिलेचा मृत्यू
रायगड, 17 मे (हिं.स.)। : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या भीषण अपघातात स्कुटीवरील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिवेगाने व बेदरकारपणे स्कुटी चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे कोस्त
Horrific accident in Mangaon; Woman dies after getting her foot stuck in ST bus


रायगड, 17 मे (हिं.स.)। : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या भीषण अपघातात स्कुटीवरील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिवेगाने व बेदरकारपणे स्कुटी चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे कोस्तेखुर्द गाव हद्दीत जे.टी.एल. कंपनीच्या रस्त्याच्या फाट्याजवळ हा अपघात घडला. मृत महिला, रा. केडगाव, या त्यांच्या मालकीच्या अॅक्टिवा स्कुटी क्रमांक एमएच 16 डीवाय 9768 वरून पुणे ते श्रीवर्धन प्रवास करत होत्या. संबंधित स्कुटी आरोपी चालवत होता.

कोस्तेखुर्द गावाजवळील फाट्याजवळ पोहोचल्यावर आरोपीने स्कुटी अतिवेगाने, हयगयीने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवली. यावेळी समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाजवळून जाताना स्कुटीवरील पाठीमागे बसलेल्या महिलेचा एक पाय स्कुटीत तर दुसरा समोरून येणाऱ्या एसटी बसमध्ये अडकला. त्यामुळे महिला खेचली जाऊन गंभीर जखमी झाली व उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 141/2026 नोंद करण्यात आला आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1), 125(A), 125(B), 281 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande