परभणीत पत्नीच्या मारेकऱ्याला जन्मठेप
परभणी, 20 मे (हिं.स.): स्वतःच्या पत्नीचा ऊसतोडीच्या कोयत्याने निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी केशव गोविंदराव मोरे (रा. कमलापूर, ता. पूर्णा) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. पी. त्रिभूवन यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना 30 नोव्हेंब
कोर्ट लोगो


परभणी, 20 मे (हिं.स.): स्वतःच्या पत्नीचा ऊसतोडीच्या कोयत्याने निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी केशव गोविंदराव मोरे (रा. कमलापूर, ता. पूर्णा) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. पी. त्रिभूवन यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

ही घटना 30 नोव्हेंबर 2022 रोजी घडली होती. शेतीला पाणी देण्यावरून झालेल्या वादातून आरोपीने पत्नी आशाबाई मोरे यांच्यावर डोक्यावर व तोंडावर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला होता. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

ताडकळस पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, घटनेच्या वेळी कुटुंबीयांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला होता. आरोपीच्या हातातील कोयत्यामुळे कोणीही जवळ जाण्याचे धाडस करू शकले नाही, अशी माहितीही समोर आली होती.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर घरासमोरील अंगणात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शरीरावर गंभीर वार झाल्याने मृतदेहाची अवस्था अत्यंत भयावह होती.

या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षाने 9 साक्षीदार तपासले, ज्यामध्ये प्रत्यक्षदर्शी, फिर्यादी, मयताची मुलगी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

आरोपीने बचाव करताना स्वतःला मनोरुग्ण असल्याचा दावा केला होता, मात्र साक्षी व वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे तो दावा न्यायालयाने फेटाळला.

न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत आजन्म कारावास, 2,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.

या प्रकरणात सरकारी अभियोक्ता, पोलिस अधिकारी आणि तपास पथक यांच्या प्रभावी कामगिरीमुळे न्यायालयात भक्कम पुरावे सादर होऊन आरोपीला शिक्षा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande